पुणे : ससूनमध्ये अतितातडीच्या उपचारांसाठी आता ‘टीम कोड ब्लू’ | पुढारी

पुणे : ससूनमध्ये अतितातडीच्या उपचारांसाठी आता ‘टीम कोड ब्लू’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात आलेल्या किंवा वॉर्डमधील अत्यवस्थ रुग्णांना अतितातडीचे उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची ’टीम कोड ब्लू’ पुढील आठवड्यापासून कार्यान्वित होणार आहे. त्यांच्यामार्फत गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्याचे प्रयत्न करण्यात येतील. असे स्वतंत्र पथक नियुक्त करणारे बी. जे. मेडिकल कॉलेज राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरणार आहे.
अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर तातडीने लक्ष देण्यासाठी हे पथक उपचार करणार आहे. रुग्णांना स्ट्रेचरवर घेऊन आयसीयू बेड उपलब्ध आहे की नाही, हे पडताळून तिथवर घेऊन जाईपर्यंत रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णाला तातडीने जागेवर उपचार मिळावेत, यासाठी ‘टीम कोड ब्लू’ अत्यावश्यक उपकरणांसह सज्ज ठेवली जाणार आहे.

‘टीम कोड ब्लू’ म्हणजे काय?
रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचे हृदय अचानक बंद पडणे, श्वासोच्छ्वास थांबणे किंवा शुध्द हरपणे, अशी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे प्राण वाचविण्यासाठी पाच मिनिटांमध्ये अतितत्पर उपचार पुरविणार्‍या तज्ज्ञांच्या टीमला ’टीम कोड ब्लू’ म्हटले जाते.

अतिगंभीर रुग्णांना ससूनमध्ये दाखल झाल्यापासून पाच मिनिटांत वैद्यकीय मदत देण्यासाठी ’टीम कोड ब्लू’ सज्ज असेल. यामध्ये तीन इंटेन्सिव्हिस्ट (अतिदक्षता विभागतज्ज्ञ), तीन डॉक्टर आणि सहा परिचारिका यांचा समावेश असेल. रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक वॉर्डमध्ये ‘टीम कोड ब्लू’चा संपर्क क्रमांक लावला जाणार आहे.
                                      – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

  •  नाडी बंद पडणे, हृदय बंद पडणे, श्वासोच्छ्वास थांबणे, अशा परिस्थितीत आपत्कालीन उपचार पुरवून रुग्णाचा जीव वाचविता येईल.
  •  मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल.
  •  एखाद्या कक्षामध्ये घोषित करण्यात आल्यानंतर दोन मिनिटांत ’टीम कोड ब्लू’ रुग्णाचा ताबा घेईल. त्यामुळे संबंधित कक्षातील नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर इतर रुग्णांना सेवा देऊ शकतील.
  • ‘टीम कोड ब्लू’ कार्यान्वित केल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कमी मनुष्यबळात उच्च दर्जाची रुग्णसेवा देता येईल.

हे ही वाचा : 

विनेश फोगटला मिळेना हंगेरीचा व्हिसा

Maharashtra Political Crisis | खातेवाटपावरून महायुतीत धुसफुस

Back to top button