Maharashtra Political Crisis | खातेवाटपावरून महायुतीत धुसफुस | पुढारी

Maharashtra Political Crisis | खातेवाटपावरून महायुतीत धुसफुस

मुंबई, दिलीप सपाटे : शिवसेना-भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्याने महायुती मजबूत झाली असली, तरी पहिल्याच दिवसापासून धुसफुस सुरू झाली आहे. खातेवाटप आणि खातेबदल करण्यावरून या वादाला तोंड फुटल्याने शपथविधी होऊनही खातेवाटप रखडले आहे. (Maharashtra Political Crisis)

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही खातेवाटप जाहीर झालेले नाही. खातेवाटपावरून तिन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. शिंदे गटाने बंड करताना अजित पवारांना लक्ष्य केले होते. अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी निधी देण्यास दुजाभाव केला, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा अजित पवारांना अर्थ खाते देऊ नये, अशी शिंदे गटाच्या आमदारांनी भूमिका आहे. या विरोधामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांना अर्थ खाते दिले नाही तर विखे-पाटील यांच्याकडे असलेले महसूल खाते दिले जाऊ शकते. याशिवाय राष्ट्रवादीला ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक न्याय, महिला व बालविकास सहकार, अशी महत्त्वाची खाती हवी आहेत. त्यावर अजून एकमत झालेले नाही.

ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण खाते हे भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यापैकी ग्रामविकास खाते जाऊ शकते. मंगलप्रभात लोढा यांच्याकडील महिला व बालविकास खाते राष्ट्रवादीकडे जाणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडील वस्त्रोद्योग, तर अतुल सावे यांच्याकडून सहकार खाते काढले जाणार असल्याचे समजते. (Maharashtra Political Crisis)

Back to top button