पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीला चारच नगरसेवक ; पक्षाच्या दोन्ही आमदारांनीही फिरवली पाठ

पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीला चारच नगरसेवक ; पक्षाच्या दोन्ही आमदारांनीही फिरवली पाठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनासाठी शहराध्यक्षांनी आयोजिलेल्या बैठकीसाठी गतवेळच्या 44 नगरसेवकांपैकी केवळ चारच नगरसेवक उपस्थित राहिले. शहरातील दोन आमदारांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्याने स्थानिक प्रमुखांचा कल नेमका कुणाकडे? याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शहर राष्ट्रवादीमधील कोणकोणते नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी आणि मुंबईमध्ये आज (बुधवारी) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार्‍या बैठकीची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती.

घोले रस्त्यावरील नेहरू सभागृहात झालेल्या बैठकीसाठी शहरातील आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, आजी-माजी आमदार आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र, या बैठकीला गतवेळच्या म्हणजे 2017 ते 2022 या कालावधीत नगरसेवक असलेल्या 44 नगरसेवकांपैकी शहराध्यक्ष जगताप सोडून केवळ चारच नगरसेवकांनी हजेरी लावली. बैठकीस उपस्थित राहणार्‍यांमध्ये विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब धनकवडे, वनराज आंदेकर यांचा समावेश होता. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे द्विधा मन:स्थितीत असलेल्या बहुतांश माजी नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, उपस्थित असलेले काही कार्यकर्ते अजित पवारांच्या बैठकीलाही उपस्थित राहणार असल्याचे खासगीमध्ये बोलत होते. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत गतवेळचे 23 नगरसेवक असल्याचा दावा शहराध्यक्ष जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केला. हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे शहरातील राष्ट्रवादीच्या आमदार बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत शहराध्यक्ष जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, बैठकीचे निरोप सर्व आजी-माजी आमदार,
माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना दिले होते. मात्र, व्यक्तिगत कारणांमुळे दोन्ही आमदार हजर राहू शकले नाहीत. त्यांचा कोणता निरोपही मिळाला नाही. मात्र, मुंबईत होणार्‍या बैठकीला ते उपस्थित राहतील.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news