

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना-भाजपच्या सत्तेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट सामील झाल्याने शिंदेंच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्तेत मिळणार्या वाट्यात राष्ट्रवादी भागीदार झाल्याने ही नाराजी उफाळून आली आहे. त्यातच मंत्रिमंडळ बैठकीचा प्रोटोकॉल निश्चित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्थान देण्यात आल्याने या नाराजीत भर पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत बरोबरीचा वाटा मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी खाती कमी होणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील मंत्रिपदाच्या दावेदारांचे स्वप्न भंगले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, ही आशा आहे. त्याचवेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले होते. मात्र, आता रायगडचे पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
आम्ही आता नाराज होऊन काय करणार? आम्हाला वस्तुस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आमची थोडीफार नाराजी राहणारच; कारण ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळाली आहे आणि ज्याला अर्धी खायची होती, त्याला आता चतकोर मिळणार आहे, असे गोगावले म्हणाले.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्यांचीही नाराजी समोर आली आहे. आम्हाला बहुमताची गरज नव्हती. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत का घेतले हाच प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला आहे. सरकारकडे 172 सदस्यांचे बहुमत असताना यांना घ्यायची गरज काय? असा सवाल शिरसाट यांनी केला. आम्हाला सत्तेत चांगला वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती; पण आता हा वाटा कमी होणार आहे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
केसरकर, देसाई यांची सारवासारव
दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र पक्षातील आमदारांच्या नाराजीवर सारवासारव केली.
केसरकर म्हणाले की, अजित पवार आज ना उद्या आमच्यासोबत येणार, याची आम्हाला खात्री होती. जी टीका झाली ती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली. शिंदे-फडणवीस यांच्या कामाची गती अजित पवार आल्याने आणखी वाढेल. आमच्या लोकांवर अन्याय होईल, असे म्हणण्याचे कारण नाही. लवकरच त्यांचाही शपथविधी होईल.