घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! हे कळायला मार्ग नाही; राज ठाकरेंची जोरदार टीका | पुढारी

घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! हे कळायला मार्ग नाही; राज ठाकरेंची जोरदार टीका

पुणे, पुढारी ऑनलाईन: राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत किळसवाणे आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काही समजायला मार्ग नाही. मात्र, हे सर्व काही असेच अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. तसेच राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले.

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज ठाकरे यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात घडणाऱ्या घडामोडी या किळसवाण्या आहेत. अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. शरद पवार यांच्या जवळची ही माणसे अचानक उठतील आणि अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला मोठी जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. भविष्यात खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असं ठाकरे म्हणाले.

सध्या कोण कुठे आहे? ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सांगता येईल. बाबू वागसकर कुठे आहेत? तर ते मनसेत आहेत, असे सांगता येते, बाकी कोण कुठे, कोणाबरोबर आहे हे सांगणे अशक्य आहे. राज्याच्या राजकारणाचा कॅरम एकदम कसा तरी फुटला आहे, कोणाची सोंगटी कुठे आहे, हे सांगता येणार नाही, असे राज म्हणाले. या सर्व गोष्टींवर आपण लवकरच मनसेच्या मेळाव्यात सविस्तर बोलू असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका गंभीर जखमी

शरद पवार हे श्रीकृष्ण तर, अजित दादा अर्जुनाच्या रूपात; मात्र आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झालायं: प्रदीप गारटकर

पुणे शहर राष्ट्रवादीचा शरद पवार यांना पाठिंबा

 

Back to top button