पुण्यात फळभाज्यांचे भाव कडाडले | पुढारी

पुण्यात फळभाज्यांचे भाव कडाडले

पुणे : उन्हामुळे पाण्याचा तुटवडा, फळभाज्यांना सातत्याने मिळणार्‍या कमी दरामुळे काढलेली पिके त्यात मान्सूनने उशिराने लावलेली हजेरी आदी सर्वांचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाल्याने पुण्यातील बाजारातही फळभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, घाऊकसह किरकोळ बाजारात फळभाज्यांचे भाव कडाडले आहेत. तर, किरकोळ बाजारात बहुतांश फळभाज्यांचे भाव शंभरी पार गेले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 2) 80 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. मागील आठवड्यात ही आवक 90 ट्रक इतकी होती. बाजारात झालेल्या आवकच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॉवर, ढोबळी मिरची, श्रावण घेवडा व मटारच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तर, अन्य फळभाज्यांचेही चढे भाव टिकून असल्याचे सांगण्यात आले. राज्यभरात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सूनने हजेरी लावली नाही. येत्या काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने पेरणीचा कामाला वेग येईल. मान्सूनने हजेरी लावली तरी आवकेत तत्काळ वाढ होणार नाही. फळभाज्यांची घटलेली आवक आणखी महिनाभर कायम राहील, अशी शक्यता ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी वर्तविली.

परराज्यांतील तामिळनाडू, कर्नाटक येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, इंदौर येथुन गाजर 6 ते 7 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, बेळगाव येथून 100 गोणी भुईमूग, हिमाचल प्रदेश येथून मटार 2 ट्रक मटार, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो आवक झाली.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 600 ते 700 गोणी, गवार व भेंडी प्रत्येकी 6 ते 7 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे साडे चार ते 5 हजार क्रेट्स, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमुग शेंग 90 ते 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदौर व आग्रा भागातून बटाटा 30 ते 35 ट्रकमधून बाजारात दाखल झाला.

पालेभाज्यांचे दर टिकून

शहराला पालेभाज्यांचा पुरवठा करणार्‍या भागांमध्ये अद्याप पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. पाण्याच्या तुटवड्याने बाजारात पालेभाज्यांची आवक कमी असली तरी दर्जेदार मालाचे प्रमाण चांगले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 80 जुडींची आवक झाली, तर मेथीची 35 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 20 हजार तर मेथीची आवक 5 हजार जुड्यांनी घटली. आवक जावक कायम असल्याने बहुतांश पालेभाज्यांचे तेजीतील दर टिकून होते.

हेही वाचा

महर्षिनगर : ड्रेनेज तुंबल्याने घरांत शिरले सांडपाणी; इंदिरानगर परिसरात नागरिक त्रस्त

शपथविधीने बारामतीत ‘थोडी खुशी, थोडा गम’

शिरूरमधील पाचही आमदार अजित पवारांसोबत ! खासदारांची मात्र ‘नो कमेंट्स’ भूमिका

Back to top button