शिरूरमधील पाचही आमदार अजित पवारांसोबत ! खासदारांची मात्र ‘नो कमेंट्स’ भूमिका | पुढारी

शिरूरमधील पाचही आमदार अजित पवारांसोबत ! खासदारांची मात्र ‘नो कमेंट्स’ भूमिका

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाचही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले, तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘नो कमेंट्स’ भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रचंड मोठे बंड करीत शरद पवार समर्थकांसह थेट शपथविधीच घेतला. राज्यात विविध कारणांमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. या सध्याच्या घडामोडींत देखील शिरूर लोकसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

अजित पवार यांच्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पाच आमदार कुणासोबत जातील? याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे. यामध्ये मतदारसंघातील सर्वांत ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांचा तर पवार यांच्यासोबत शपथविधी झाला असून, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दैनिक ’पुढारी’ला सांगितले. तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे अजित पवार यांच्या शपथविधीदरम्यान मुंबईत उपस्थित असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आतातरी खेडला मंत्रिपद मिळणार का?

शिंदे सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात अजित पवार यांच्यासोबत आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा देखील शपथविधी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार समर्थक म्हणून नेहमी दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळत आली व जुन्नर, खेडच्या आमदारांना डावलण्यात आले. परंतु, आता अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी करीत शिंदे सरकारमध्ये समाविष्ट झालेल्या अजित पवार समर्थक व खेड तालुक्याचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आतातरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

इंदापूर : आ. भरणे भाजपबरोबर; हर्षवर्धन पाटलांचे ‘टेन्शन’ वाढले

कराडात शरद पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Back to top button