…अखेर दादांनी निशाणा साधलाच; धनुष्यबाणाच्या ‘त्या’ फोटोचीच सर्वत्र चर्चा | पुढारी

...अखेर दादांनी निशाणा साधलाच; धनुष्यबाणाच्या ‘त्या’ फोटोचीच सर्वत्र चर्चा

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर गत पंधरवड्यातील त्यांच्या एका कार्यक्रमाचा फोटो बारामतीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी धनुष्याला बाण लावत निशाणा साधला होता.

त्या वेळीही माध्यमांनी पवार नेमका कोणाचा निशाणा साधणार, असा सवाल उपस्थित केला होता. अखेर अजित पवार यांनी या एकाच निशाण्यात अनेकांना गारद केले. त्यांच्या या कृतीमुळे बारामतीत पक्षाच्या जुन्या फळीत शांतता पसरली आहे. येथील एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाकडून गत पंधरवड्यात बारामतीत हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या फोरमच्या सर्वेसर्वा आहेत. विद्या प्रतिष्ठानजवळ आयोजित या कार्यक्रमात अजित पवार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत खेळाचा आनंद लुटला होता. याशिवाय याच वेळी त्यांनी धनुष्याला बाण लावत अचूक निशाणा साधला होता. त्यांच्या या फोटोची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. माध्यमांनी त्याचे अर्थ लावण्याचे प्रयत्न केले होते. अखेर घडलेही त्याप्रमाणेच.

रविवारी अजित पवार हे काही सहकार्‍यांसह सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या बातमीने बारामतीत काहींना आनंद, तर काहींमध्ये नाराजी पसरली. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बारामतीत काहींनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी या अडचणीच्या काळात माध्यमांना प्रतिक्रियाच द्यायला नकोत यासाठी फोन बंद करून टाकले. अजित पवार यांच्या मागील बंडावेळी बारामतीत शरद पवार यांच्या समर्थनार्थ, साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे फ्लेक्स लागले होते. बारामतीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. तसा तणाव यावेळी दिसला नाही.

दुपारनंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका जाहीर केल्यानंतर बारामतीकर अधिक संभ्रमात पडले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार हे त्यांच्याशी चर्चेविनाच सरकारमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्षातील जुन्या फळीतील येथील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. बारामतीतील तरुणवर्ग अजित पवार यांच्या बाजूने असताना शरद पवार यांना मानणारा जुना मोठा वर्ग बारामतीत आहे. या दोन्ही वर्गाने आपापल्या भूमिका जपून मांडल्या. एकूणच अजित पवार यांचे पक्षात सहभागी होण्याच्या बाबतीत बारामतीत संमिश्र भूमिका दिसून आल्या.

बेबनावाची कल्पना बारामतीकरांना नव्हती

गत आठवड्यात 25 जून रोजी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र दिसले होते. खुद्द अजित पवार व सुप्रिया सुळे हे दोघे दुपारी दोनपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत एकत्र होते. दोघांमध्ये हसत-खेळत चर्चा करत होते. तद्नंतर शरद पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने पार पडला. त्या वेळी पवार कुटुंबातील या बेबनावाची बिलकूल कल्पना बारामतीकरांना आली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी केंद्र सरकार, भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर अवघ्या आठच दिवसांत अजित पवार भाजपसोबत गेल्याचे दिसून आले.

भाजपची बारामतीत अडचण

भाजप-सेना सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्याने बारामतीत भाजपची मोठी अडचण झाली आहे. पवारांसारख्या बलाढ्य शक्तीशी भाजपमधील काहींनी आजवर येथे दोन हात केले. पक्षाची फारशी ताकद नसताना त्यांनी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. आता खुद्द अजित पवार हेच भाजपसोबत आल्याने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यांची येथील भूमिका यापुढे काय असेल, याबद्दलही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्‍या तर आश्चर्य वाटायला नको : राज ठाकरे

सनी लिओनीच्या केनेडी चित्रपटाचे जगभरात कौतुक; NIFFF-BIFAN मध्ये प्रीमियर होणार

पुणे : चार टोळ्यांतील 10 चोरांना अटक तीन अल्पवयीन साथीदारही ताब्यात

Back to top button