पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर; कोणते पवार? पुण्यातही विवंचना ! | पुढारी

पवारांच्या वादात कार्यकर्ते सैरभैर; कोणते पवार? पुण्यातही विवंचना !

पांडुरंग सांडभोर

पुणे : अजित पवारांच्या धक्कातंत्राने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या समवेत थांबण्याचा निर्णय घेतला, तर दोन आमदारांपैकी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी मात्र त्यांची थेट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे एकदंरीत साहेब की दादा? या विंवचनेत माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते पडल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेत 2007 ते 2017 या कालावधीत पुणे पॅटर्नचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचीच सत्ता होती. या सर्व सत्तेची सूत्रे अजित पवारांच्याच हातात होती. त्यामुळे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक अशा महत्त्वाच्या पदांपासून थेट कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचे त्यांच्याशी संबंध होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना-भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रमुख पदाधिकार्‍यांनी थेट त्यांच्यासमवेत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात जाहीर भूमिका घेऊन अजित पवारांबरोबर असल्याची दिशा स्पष्ट केली आहे. मात्र, शहराध्यक्ष जगताप यांच्यासह खासदार अ‍ॅड. चव्हाण यांनी थेट शरद पवार यांच्यासमवेतच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.

याशिवाय अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी सावध पवित्रा घेऊन थेट भूमिका घेणे टाळले आहे. चित्र स्पष्ट झाल्यावर भूमिका स्पष्ट करू, असे काही पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी नक्की कोणासमवेत असेल? हे स्पष्ट व्हायला काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे.

राजकीय अस्वस्थता वाढली

पुणे शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हेच एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीचा सामनाही याच दोन पक्षांत रंगतो. आता मात्र थेट अजित पवार भाजपसमवेत आल्याने दोन्ही पक्षांतील विधानसभा आणि महापालिकेतील इच्छुकांची राजकीय अस्वस्थता वाढली आहे. प्रामुख्याने भाजपच्या नगरसेवकांसमोर गेल्या पाच वर्षांपासून निवडणूक लढणार्‍या अजित पवार समर्थकांना आपले नक्की काय होणार? असा मोठा प्रश्न पडला आहे. हीच अवस्था भाजपच्या इच्छुकांची झाली आहे.

पालिका निवडणुकीत भाजप-सेना आणि अजित पवार गट एकत्र येऊन निवडणुका लढविणार असेल, तर प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुकांना घरी बसावे लागू शकते. अशा वेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तसेच मनसेच्या गळाला अनेक इच्छुक लागू शकतील. मात्र, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? यावरही अनेक गणिते अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडी कमकुवत अजित पवार थेट भाजप-सेनेसमवेत जाण्याच्या निर्णयाने शहरातील महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे.

विधानसभेच्या आठ मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी भाजपचे, दोन ठिकाणी राष्ट्रवादी आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद एकत्र आल्याने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. ही आघाडी पुढे महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल, असेच चित्र होते.

मात्र, राष्ट्रवादीत अजित पवारांना मानणारा मोठा गट भाजपसमवेत निवडणुकीत एकत्र आल्यास महाविकास आघाडीला फटका बसेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला अजित पवार यांचा फायदा होणार असून, काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्हींना त्याचे परिणाम सहन करावे लागतील, अशी शक्यता आहे.

हेही वाचा

कोल्हापूर जिल्ह्यातील सात धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

मुख्य प्रतोदपदी शरद पवार यांच्याकडून आव्हाड, अजित पवारांकडून अनिल पाटील

शरद पवारांचे आज सातार्‍यात डॅमेज कंट्रोल

Back to top button