पुण्यातील ‘त्या’ युवकांना मुख्यमंत्र्यांच्यावतीने 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्त | पुढारी

पुण्यातील ‘त्या’ युवकांना मुख्यमंत्र्यांच्यावतीने 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचविणार्‍या लेजपाल जवळगे, हर्षद पाटील व दिनेश मडावी या जिगरबाज तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या बक्षिसाचे वाटप शनिवारी (दि. 1) करण्यात आले. पुण्यातील शिवसेना भवनात पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे व शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते ही रक्कम या तरुणांना सुपूर्त करण्यात आली. या वेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या तरुणांशी संवादही साधला. तरुणांनी दाखविलेले धैर्य अतुलनीय असून, या आर्थिक मदतीतून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच पाठबळ मिळेल, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना दिला.

पीडित तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत करण्यात आली. पीडित तरुणीला ही मदत तिच्या घरी जाऊन देण्यात आली तसेच तरुणीला मदत करण्यासाठी तिच्यासोबत आलेल्या मित्रालाही पंचवीस हजारांची मदत व होणार्‍या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेत शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवीत महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी करण्यात आली.

पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुण्यात नोकरीनिमित्त व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असेही पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. वाघमारे म्हणाल्या.

या वेळी सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवासेना राज्य सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्षा लीना पानसरे, पूजा रावेतकर, युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश घारे, शहर संघटक प्रमोद प्रभुणे, श्रीकांत पुजारी, शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, उपशहरप्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, विकी माने, श्रद्धा शिंदे, सुदर्शना त्रिगुणाईत, श्रुती नाझीरकर, सुरेखा कदम, कांचन दोडे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी पाहणी

पारनेर : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अडसूळ बिनविरोध

Monsoon Updates : गुजरातमध्‍ये पुराचे १० बळी, ७ जिल्‍ह्यांमध्‍ये पूरसदृश परिस्थिती

Back to top button