पुणे; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित कात्रज – कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 200 कोटींचा निधी मिळणार आहे. या अनुषंगाने महापालिका अधिकार्यांनी नुकतीच कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी केली. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सासवड रस्ता या भागांतून येणारी अवजड वाहने कात्रज – कोंढवा रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जातात. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने कात्रज ते कोंढवा येथील खडी मशीन चौकदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.