पानशेत रस्त्यावरील सोनापूर पूल पुन्हा खचला

पानशेत रस्त्यावरील सोनापूर पूल पुन्हा खचला

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूरजवळील खडकवासला धरणतीरावरील पूल पुन्हा खचला. जोरदार पावसात खचलेल्या पुलासह रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र पूल व रस्त्याला धोका नसल्याचा दावा केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार म्हणाले, वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोन दिवसांपूर्वी पुलाची पाहणी करण्यात आली. खचलेला भाग वाहतुकीला बंद आहे. पावसाचे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या पंधरा दिवसांत पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

पूल व रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. गेल्या वर्षी 12 जुलैला अतिवृष्टीमुळे पूल खचल्याने काही दिवस वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने दुरुस्ती करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तेव्हापासून एकेरी वाहतूकच सुरू आहे. खचलेल्या पूल व रस्त्याकडे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी थेट विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने तत्काळ पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही.

याबाबत आमदार तापकीर म्हणाले, पुलाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. आवश्यक यंत्रसामग्रीसह तातडीने नवीन पुलाचे, खचलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. पानशेत- वरसगाव भागातील साठ गावांना पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू होईपर्यंत तसेच काम सुरू असताना तेथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी मोसे विभाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष लालासाहेब पासलकर व पानशेतचे माजी उपसरपंच बाळासाहेब कोंडेकर यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news