पिंपरी : पदोन्नती दिली खरी ! पण चालकांना प्रशिक्षणच नाही | पुढारी

पिंपरी : पदोन्नती दिली खरी ! पण चालकांना प्रशिक्षणच नाही

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एकूण 19 कर्मचार्‍यांना ज्येष्ठतेनुसार वाहनचालक पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्यांना अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कचरा वाहतूक करणारी वाहने आदी चालविण्याचे कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना थेट ती वाहने चालविण्यास देण्यात आली आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने मजूर, शिपाई अशा कर्मचार्‍यांना वाहनचालक म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यांना जड वाहने चालविण्याचा अनुभव नाही. सन 2018 ला पदोन्नती देताना वाहन चालविण्याची चाचणी व वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात आले होते. आता, तसे काहीही करण्यात आलेले नाही. 19 कर्मचार्‍यांना 14 जूनला पदोन्नती देऊन थेट जड वाहनांवर नियुक्त केले आहे. अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कचरा वाहतूक करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशा जड वाहनांवर त्यांची नेमणूक केली आहे. प्रशिक्षण न देता त्यांची नेमणूक करण्यात आल्याने वर्दळीच्या रस्त्यावर ही वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जड वाहनांचे प्रशिक्षण गरजेचे
पदोन्नती दिलेल्या 19 कर्मचार्‍यांना जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे गरजेचे होते. त्यानंतर त्यांना अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कचरा वाहतूक वाहने, पाण्याचे टँकर चालविण्याचे काम सोपवावे, असे वाहन चालकांनी सांगितले.

वाहनचालकांना मार्गदर्शन करणार
वाहनचालकांकडे अवजड वाहने चालविण्याचा परवाना आहे. त्याचा वाहन परवाना पाहूनच त्यांची वाहनचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे नाही. मात्र, संबंधित विभागाकडून त्यांना कामाबाबत मार्गदर्शन
केले जाईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

नियुक्ती मिळावी म्हणून खटाटोप
महापालिका अधिकार्‍यांच्या वाहनावर चालक म्हणून नियुक्ती असणे हे खूप सोईस्कर काम आहे. दररोजच्या कामासोबत ओव्हर टाइमचा भत्ता मिळतो. तसेच, अधिकार्‍यांच्या वाहनावर असल्याने रूबाबही वाढतो. त्यामुळे वाहनचालक अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, कचरा वाहतूक वाहन, पाण्याचे टँकर व इतर वाहनांवर काम करण्यास नाखूष असतात. त्यामुळे विविध कारणे पुढे करून अधिकार्‍यांच्या वाहनावर नेमणूक मिळावी म्हणून खटाटोप केला जात आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

हे ही वाचा : 

नगर : सोनाराला लुटणार्‍या तिघांना बेड्या

पुणे : फुटबॉल खेळताना वाद; तरुणास बेदम मारहाण

 

Back to top button