नगर : सोनाराला लुटणार्‍या तिघांना बेड्या | पुढारी

नगर : सोनाराला लुटणार्‍या तिघांना बेड्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेरच्या एका सोनाराला लुटणार्‍या व चोरीतील दागिने विक्रीसाठी जात असलेल्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींकडून गावठी कट्टा, दागिने व जीप असा सुमारे सव्वाचौदा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. खंडेश्वर रमेश ठोंबळ (वय 23, रा. आंत्रे, ता. शेवगाव), आकाश बाळासाहेब चौधरी (वय 23 रा. रांजणगाव, ता. शेवगाव), प्रमोद रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.मुसळे वस्ती, लोणी, ता. राहता) अशी आरोपींची नावे आहेत.

निमगाव जाळी येथील एका सोनारावर पाळत ठेवून दि.26 जून रोजी डोळ्यात मिरची पूड टाकून आरोपींनी सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग पळवून नेली होती. त्यानंतर चोरटे गुरुवारी जीपने नेवासा फाट्यावरून जाणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पथकाने सापळा लावून नेवासा फाट्याजवळ आरोपींना ताब्यात घेतले. पाच लाखांचे वाहन, 30 हजारांचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे, 45 हजारांचे तीन मोबाईल, एक लाख रुपये किमतीचे दागिने असा सुमारे 14 लाख 26 हजार 972 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे तपास करीत आहेत.

Back to top button