मांजरी पाणी योजनेचे शुक्लकाष्ठ संपेना! | पुढारी

मांजरी पाणी योजनेचे शुक्लकाष्ठ संपेना!

प्रमोद गिरी

मांजरी : मांजरी पाणीपुरवठा योजनेची प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गेल्या काळात अनेक वेळा पाहणी केली. तसेच आढावा बैठका अन् श्रेयासाठी दोन वेळा उद्घाटन होऊनही या योजनेमागील शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नाही! ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात अजूनही अडथळे येत असल्याने पाण्याची चातकासारखी वाट पाहणार्‍या नागरिकांत प्रशासनाविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. मांजरी बुद्रुक गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 43 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले.

मात्र, लष्कर, महामार्ग प्राधिकरण, रेल्वे यांच्या हद्दीतून जलवाहिनीसाठी परवानगी मिळायला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागला. दरम्यानच्या काळात तीन साठवण टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, पन्नास किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्यांची कामे मार्गी लागली. पंधरा किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीचाही प्रश्न मिटला. गेल्या सहा महिन्यांत महादेवनगर परिसरातील दोन साठवण टाक्यात पाणीदेखील आले. आमदार चेतन तुपे पाटील यांनी व त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या दिवशी या योजनेचे उद्घाटनही केले. महादेवनगर येथील नागरिकांनी पाणी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. मात्र, त्याच वेळी मुख्य गावठाणासह इतर वस्त्यांमध्ये या योजनेचे पाणी अद्यापही न मिळाल्याने नागरिकांत नैराश्याची भावना आहे.

राहिलेल्या भागात पाणी पोहोचण्यासाठी निधीच्या कमतरतेसह महामार्ग प्राधिकरण व रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची गरज आहे. सोलापूर महामार्गाने वितरणवाहिन्या नेण्यासाठी महामार्ग प्राधिकरण सुमारे पावनेतीन कोटी रुपयांची मागणी करीत आहे. मांजरी-मुंढवा रस्ता परिसरासह वाढलेल्या मिळकतींना पाणी पुरवण्यासाठी आणखी सुमारे तीस किलोमीटरच्या वितरिका टाकण्याची आवश्यकता आहे. गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने दरमहा येणारे सुमारे चाळीस हजार रुपयांचे वीजबिल कसे भरायचे, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, त्यामुळे संपूर्ण गावाला नेमके कधी पाणी मिळेल, हे सांगणे सध्या कठीण आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महादेवनगर येथील नागरिक अपुर्‍या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करीत आहेत. योजनेचे पाणी येऊनही जीवन प्राधिकरण व महापालिका पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करू शकत नसेल, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– पुरुषोत्तम धारवाडकर, माजी सरपंच, मांजरी बुद्रुक

ही योजना अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित केलेली नाही. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतरित करण्यात येईल.प्राधिकरणाकडे सध्या योजनेच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध नाही. महापालिकेकडून योजनेचे राहिलेले काम व वीजबिलासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

– एम. जी. देवकर, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

महादेवनगर येथे दहा दिवसांपासून पाणी बंद

महिनाभरापूर्वी या योजनेतून महादेवनगरसाठी सुरू केलेला पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. फूटबॉलमध्ये कचरा अडकल्याने पाणीपुरवठ्यात अडथळा येत असल्याचे तर कधी कालव्यात पाणी नसल्याने पाणीपुरवठा होत नसल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे प्रा. विलास जाधव, शिवाजी भाडळे यांनी सांगितले.

हेही वाचा

ओतुर : विहिरीत पडलेल्या बिबट मादीला जीवदान

धक्कादायक ! शिवशाही बसचा पत्रा उडून स्कूल बसवर आदळला

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात सोमवारी जनता दरबाराचे आयोजन; तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची माहिती

Back to top button