पुणे : गुप्तचर महिलेच्या मदतीने भारतीय संरक्षण दलाची गुपिते पाकिस्तानला दिल्याच्या कारणावरून डीआरडीओचा माजी अधिकारी डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरूलकर याच्या विरोधात शुक्रवारी विशेष न्यायाधीश कचरे यांच्या न्यायालयात 1 हजार 835 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएसने) हे दोषारोपपत्र दाखल केले. देशाची गोपनीय माहिती शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
भारतीय संरक्षण दलाची गुपिते पाकिस्तानी गुप्तहेर झारादासच्या मदतीने पाकिस्तानला पुरविण्याचे काम कुरुलकरने केले होते. चौकशीनंतर एटीएसने 3 मे 2023 रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. डीआरडीओ दिघी येथील संशोधन व विकास विभागाच्या संचालक पदावर असलेला कुरुलकर हनिट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्या तरुणीने त्याच्यामार्फत अनेक भारतीय गुपिते हस्तगत करून ती पाकिस्तानला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्यातील छेडछाड झाल्याचे विश्लेषण, यूकेच्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केला गेला. मात्र, त्याचे लोकेशन पाकिस्तान येथील असल्याचे पुरावे मिळाले. त्यानंतर पुणे न्यायवैद्यक शाळेच्या अहवालातून समोर आलेली माहिती, या बाबी आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हवाई दलातील अधिकारी निखिल शेंडे यांच्या जबाबामध्ये कुरुलकरचा फोन बंद झाल्यानंतर झारादास गुप्ता हिने शेंडे यांच्या माध्यमातून कुरुलकरशी साधलेला संपर्क, त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे करण्यात आलेले तांत्रिक विश्लेषण आणि त्यासंबंधी पुरावे, साक्षी, जबाब आरोपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
एटीएसच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शुक्रवारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. मात्र गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने व तपास होणे गरजेचे आहे. गुन्ह्यातील महत्त्वाची आरोपी झारादास गुप्ता हिला सहआरोपी करण्यात आले असून त्यासंबंधीचे देखील पुरावे जोडण्यात आले आहेत
गुन्ह्याचा तपास अत्यंत गतीने करण्यात आला आहे. 59 दिवसांत आरोपपत्र दाखल करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. ऑफिशियल सिक्रेसी अॅक्टच्या विविध कलमांनुसार हे आरोपत्र दाखल केले आहे. दरम्यान, हवाई दलातील अधिकारी असलेल्या शेंडे यांना साक्षीदार करण्यात आले.
– सुजाता तानवडे, पोलिस निरीक्षक, दहशतवादविरोधी पथक
हेही वाचा