संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : संशयितांची कोठडी आजपर्यंत वाढविली
गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा येथील उद्योजक संतोष शिंदे तिहेरी आत्महत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित माजी नगरसेविका शुभदा पाटीलसह तिचा साथीदार निलंबित पोलिस अधिकारी राहुल राऊत यांना यापूर्वी सुनावलेली पाच दिवसांच्या कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी पुन्हा एक दिवसाची कोठडी वाढवून दिली. त्यामुळे शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.
संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात संशयित पाटील व राऊत यांना सुनावलेल्या पाच दिवसांच्या कोठडीची शुक्रवारपर्यंत मुदत होती. दुपारी तीन वाजता पोलिसांनी दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. नीता चव्हाण यांनी मुद्दे मांडताना, वरिष्ठ अधिकार्यांनी घटनेचा तपास केला आहे. शुभदा व राऊत यांचे जुने मोबाईल ताब्यात घेतले असून, दोन्ही मोबाईलमधील माहिती आधीच पुसून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. तर शुभदाच्या नव्या मोबाईलचा कोड सापडत नसल्याने अधिक माहिती मिळालेली नाही. हे दोघेही पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाहीत. त्यांच्या मोबाईलमधील माहिती व बँक तपशिलांच्या तपासासाठी पोलिसांना आणखी सात दिवसांची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी केली.
फिर्यादीतर्फे अॅड. शिवाजीराव राणे यांनी मुद्दे मांडताना, राऊत याने पोलिस खात्यात काम केले आहे. कायद्याचे ज्ञान असल्याने तो अतिशय हुशारीने माहिती देण्याचे टाळत आहे. त्याच्यावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे लोक जबाबासाठी पुढे येत नसल्याचे स्पष्ट केले. संशयितांच्या वतीने सागर माने, संजय मगदूम यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी कर्नाटकातील वकील नियुक्त केले होते. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अॅड. शिवाजीराव राणे यांना फिर्यादीतर्फे बाजू मांडण्याची विनंती केली. त्यानुसार अॅड. राणे यांनी फिर्यादी शुभम बाबर यांच्या वतीने शुक्रवारी न्यायालयीन कामकाजात सहभागी होत सरकारी पक्षाशी पूरक अशी बाजू मांडली. त्यांना अॅड. बी. बी. घाटगे यांनी सहकार्य केले.

