नसरापूर : जीर्ण वाडा कधीही घेईल अनेकांचे बळी | पुढारी

नसरापूर : जीर्ण वाडा कधीही घेईल अनेकांचे बळी

माणिक पवार

नसरापूर(पुणे) : नसरापूरचा जीर्ण वाडा अखेरच्या घटका मोजत असून, यातील आरोग्य केंद्राचे छत पावसाच्या गळतीमुळे कोसळले आहे. सुदैवाने आरोग्य कर्मचारी बचावले आहेत. जीव मुठीत घेऊन कारभार हाकत असलेला जीर्ण वाडा पडून जीवितहानी होण्याची गाफील सरकार आणि सुन्न झालेले प्रशासन अधिकारी वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.

नसरापूर (ता. भोर) येथील बकाल व जीर्ण वाड्यातील आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा कक्षातील छताचे काही भाग कोसळले आहेत. या वेळी सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी बचावले आहेत. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडलाधिकारी प्रदीप जावळे, सरपंच सपना झोरे, वैदकीय अधिकारी डॉ. कोमल भालेराव, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, ज्ञानेश्वर झोरे यांनी मोडकळीस आलेल्या इमारतीची पाहणी केली. या कक्षात काम करता येत नसल्याने सध्या तातपुरत्या स्वरूपात नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात प्रयोगशाळा कक्षातील कामकाज करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना हलविण्यात आले आहे.

वाड्यात आहेत सरकारी कार्यालये

पंतसंचिवांनी बांधलेल्या वाड्याची मालकी नसरापूर ग्रामपंचायतीकडे असून, यात आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोलिस स्टेशन, तलाठी आदी कार्यालये असल्याने कामानिमित्त रोज शेकडो लोकांची या ठिकाणी वर्दळ असते. संपूर्ण वाड्याची इमारत मोडकळीस आली असून, भिंतींना चिरा व मोठे तडे गेले आहेत. सर्वच कार्यालयांत छताला गळती लागली आहे. याबाबत स्थानिक पातळीवरून पाठपुरावा करून देखील कोणतेच सरकार व वरिष्ठ अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. वाडा पडून जीवितहानी होण्याची सरकार व अधिकारी वाट पाहत आहेत का? असा खडा सवाल व्यक्त होत आहे.

घटनेपूर्वी दखल घेण्याची गरज

दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने पंचनामा करून वाडा पाडण्याची गरज आहे. जादा दुर्लक्ष केल्यास केव्हाही दुर्घटना घडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाड्याबाबत मागील काळापासून ग्रामपंचायतीच्या वतीने सतत पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. संपूर्ण वाडा पाडून ग्रामसचिवालय बांधण्यासाठी नव्याने पाठपुरावा सुरू आहे. जीर्ण वाड्याबाबत मंडलाधिकार्‍यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असून, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह सोमवारी (दि. 3) वाड्याची पाहणी करून वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला जाईल.

– राजेंद्रकुमार कचरे, प्रांताधिकारी, भोर

हेही वाचा

सावधान : सापांच्या प्रजननाचा काळ; बूट, मुलांची दप्तरे, खेळण्याच्या जागा, घराच्या परिसरावर लक्ष ठेवा

कोल्हापूर-शिर्डी मार्गावर डिसेंबरपासून विमानसेवा

Samruddhi highway Bus Accident : बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Back to top button