पुणे : पार्किंगच्या शोधात मेट्रो

पुणे : पार्किंगच्या शोधात मेट्रो

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर पुणेकरांच्या खासगी वाहनांसाठी पार्किंग किंवा वाहनतळ असावे, असे नियोजन असते. या नियोजनानुसार पुण्यातील मेट्रोच्या एकूण 30 स्थानकांपैकी 7 ठिकाणी जागा मिळवण्यात मेट्रोला यश आले आहे. मात्र, उरलेल्या 23 स्थानकालगत खासगी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी जागा मिळावी, याकरिता मेट्रोने पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांना पत्र दिले आहे. आता जागा मिळवून देण्यात दोन्ही महापालिकांना किती यश येते, यावर पुणेकरांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न अवलंबून राहणार आहे.

पुणेकरांनी त्यांच्या घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत खासगी वाहनाने जाऊन तेथील वाहनतळावर आपले वाहन ठेवून मेट्रोने प्रवास करणे अपेक्षित आहे. नवी दिल्लीतही अशाप्रकारे दुचाकी आणि चारचाकीसाठी वाहनतळ विकसित करण्यात आले आहेत. मात्र, पुण्यामध्ये फक्त सातच स्थानकाजवळ पार्किंग जागा मिळवण्यात मेट्रोला यश आले आहे. उरलेल्या स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय स्थानकासह अनेक स्थानकांलगत वाहनतळासाठी जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांनी स्थानकाजवळ पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.

या सात ठिकाणी जागा

  • पिंपरी-चिंचवड स्टेशन
  • संत तुकाराम महाराजनगर स्टेशन
  • आयडीयल कॉलनी स्टेशन
  • मंगळवार पेठ स्टेशन
  • सिव्हील कोर्ट स्टेशन
  • वनाज डेपो
  • स्वारगेट

अशी आहे संपूर्ण मेट्रोची रचना

  • 02 कॉरिडोअर
  • 33.2 किलोमीटर मार्ग
  • 30 स्टेशन्स
  • 02 कोच देखभाल दुरुस्ती डेपो

मेट्रो स्थानकालगत वाहनतळ विकसित करण्याचा प्रयत्न महामेट्रो करत आहे. त्यासाठी आवश्यक जागांकरिता पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागू नये, यासाठी पीएमपीची फिडर सेवा, रिक्षा सेवा आदींचा अवलंब केला जाईल. जगभरातील मेट्रोमध्ये खासगी वाहनांचा किमान वापर हेच तत्त्व अमलात आणले जाते.

– हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महा मेट्रो

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news