पुणे : दर्शनाच्या हत्येसाठी वापरलेले कटर पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

पुणे : दर्शनाच्या हत्येसाठी वापरलेले कटर पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लग्नासाठी नकार दिल्याने दर्शनावर वार करण्यासाठी राहुल याने वापरलेले कटर पोलिसांनी जप्त केले आहे. याखेरीज, राहुल आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घेतलेले कपडे हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी हंडोरेच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (दि. 3) वाढ करण्यात आली आहे. लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शनावर राहुल याने कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले.

त्यानंतर दगडाने मारहाण करीत तिचा खून केला, अशी कबुली राहुल याने नुकतीच पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तूंची माहिती घेत त्या जप्त करण्यात येत आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने हंडोरे याला गुरुवारी (दि. 29) न्यायालयात हजर करण्यात आले होते. हंडोरे याने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच खून करून तो काही दिवस फरार झाला होता.

फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत न्यायालयाने हंडोरेच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.

18 जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती मित्र हंडोरेसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक करण्यात आली.

हे ही वाचा : 

संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : सपोनि राहुल राऊत निलंबित  

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

 

Back to top button