संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : सपोनि राहुल राऊत निलंबित | पुढारी

संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : सपोनि राहुल राऊत निलंबित

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरणात गडहिंग्लज पोलिसांच्या अटकेत असलेला अमरावती मुख्यालयातील स. पो. नि. राहुल श्रीधर राऊत याला अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी निलंबित केले. माजी नगरसेविका शुभदा पाटील हिने स.पो.नि. राऊत याच्या मदतीने आपल्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून एक कोटींची खंडणी मागितल्याचा उल्लेख संतोष शिंदे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या दोघांनाही पोलिसांनी विजापुरातून अटक केली होती. त्यांना 30 जूनपर्यंत पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, राऊत हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारनाम्यांमुळे राज्याच्या पोलिस दलात चर्चेत होता. लाच मागणे, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने शासकीय रेकॉर्ड व मोबाईल हिसकावून घेणे, अज्ञातस्थळी बळजबरीने घेऊन जाणे आदी कारणांवरून त्याच्यावर यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुंबईत कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍याच्या तक्रारीवरूनही राऊतवर 2020 मध्ये डीएननगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा झाला होता.

त्यानंतर राऊत याची वेतनवाढ रोखून त्याची अमरावती मुख्यालयाला बदली करण्यात आली होती. शिंदे मृत्यू प्रकरणातील अटकेनंतर सोमवारी या दोघांना गडहिंग्लजच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यास नेले असता नागरिकांनी त्यांच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला होता. शुक्रवारी संशयित शुभदा पाटील आणि राऊतची पोलिस कोठडी संपणार असून, त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Back to top button