बांधकामांच्या ठिकाणी पाळणाघर, अंगणवाड्या ; पुणे महापालिकेचा पुढाकार | पुढारी

बांधकामांच्या ठिकाणी पाळणाघर, अंगणवाड्या ; पुणे महापालिकेचा पुढाकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी आता पाळणाघर आणि अंगणवाड्या यांच्या सेवा सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये महापालिका आणि बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेने पुढाकार घेतला आहे. शहरात 200 पेक्षा जास्त ठिकाणी ही पाळणाघरे उभारली जाणार आहेत.

महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी माहिती दिली. महापालिका आणि राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून (आयसीडीएस) या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शहराच्या हद्दीत उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या ठिकाणी बांधकाम मजुरांसाठी विकसकांकडून लेबर कॅम्पची सुविधा केली जाते. मात्र, या ठिकाणी मजुरांच्या लहान मुलांसाठी कोणत्याही सुविधा नसतात. त्यामुळे या मुलांची हेळसांड होते. ही बाब लक्षात घेऊन या मुलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याची मागणी क्रेडाई तसेच स्वयंसेवी संस्थांकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. त्याला महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

पाच ठिकाणी जागा निश्चिती
अंगणवाडी आणि पाळणाघर यासाठी क्रेडाईतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात आहेत. पहिल्या टप्यात 5 जागा निश्चित केल्या जाणार असून, या ठिकाणी असलेल्या इतर सुविधा महापालिका तसेच आयसीडीएस उपलब्ध करून देणार आहे. शासनची मान्यता घेऊन या अंगणवाड्याही सुरू केल्या जाणार आहेत. या शिवाय, शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देणे, तसेच शिक्षण झालेल्या मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे उदास यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सातारा : पंढरीला जाताना काळाचा घाला; एक ठार, 7 जखमी

पुणे : गॅस संपल्यामुळे लाकडावर अंत्यसंस्कार ; धोबीघाट स्मशानभूमीतील घटना 

Back to top button