सातारा : पंढरीला जाताना काळाचा घाला; एक ठार, 7 जखमी | पुढारी

सातारा : पंढरीला जाताना काळाचा घाला; एक ठार, 7 जखमी

कोरेगाव / वरकुटे – मलवडी, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकर्‍यांच्या गाडीला लोधवडे (ता. माण) येथे गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. पुढे जाणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करताना बोलेरो उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक ठार झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील आहेत. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कल्याण भोसले (रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अण्णा गाढवे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासाहेब थोरात (वय 42), सागर भोसले, विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50) व रूद्र भोसले (13, सर्व रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) अशी जखमींची नावे आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त गुजरवाडी, ता. कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो (क्रमांक एम. एच. 11. बी. एच. 0896) घेऊन पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. या गाडीत त्यांच्यासह 8 जण वारकरी होते. गुरूवारी सकाळी 8 वाजता बोलेरो गोंदवले खुर्द, लोधवडे फाट्यानजीक आली असता दुसर्‍या गाडीला ओव्हरटेक करताना बोलेरो उलटली. ती चार वेळा पलटी होऊन रानात जाऊन पडली.

अपघाताची माहिती समजताच लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. मात्र, या अपघातात कल्याण भोसले यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Back to top button