यंदाही राबवणार सेतू अभ्यासक्रम ; 4 ते 26 जुलै दरम्यान होणार अंमलबजावणी | पुढारी

यंदाही राबवणार सेतू अभ्यासक्रम ; 4 ते 26 जुलै दरम्यान होणार अंमलबजावणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदाही करण्यात येणार आहे. त्यात आधीच्या इयत्तांतील महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या असून, दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी, तर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाची 4 ते 26 जुलै दरम्यान अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय आणि इयत्तानिहाय क्षमता साध्य होण्यासाठी गेली दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर केलेल्या राज्यव्यापी अभ्यासात हा अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आल्याने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्येही अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सेतू अभ्यासक्रम छापील स्वरूपात तयार करण्यात आला आहे, तर अन्य व्यवस्थापनाच्या शाळांसाठी हा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरणाच्या https:// www. maa. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका विद्यार्थिकेंद्रित आणि कृतीकेंद्रित अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. विषयनिहाय कृतिपत्रिका विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील अशाप्रकारे नियोजन देण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षकांनी कृतिपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे आवश्यक आहे. अभ्यास पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी त्या इयत्तेची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

असे आहे अंमलबजावणी वेळापत्रक
30 जून ते 3 जुलै : पूर्वचाचणी
4 जुलै ते 26 जुलै : वीस दिवसांचा सेतू अभ्यास
27 ते 31 जुलै : उत्तर चाचणी

हे ही वाचा : 

पुणे : आनंदधारा ! नागरिक सुखावले ; लवासा भागात अतिवृष्टीची नोंद

नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

Back to top button