मान्सूनचा वेग प्रचंड वाढला ; कोकणला 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

मान्सूनचा वेग प्रचंड वाढला ; कोकणला 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुजरात ते केरळ किनारपट्टीसह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कोकणला 2 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; तर पुणे, सातारा व नाशिक घाटात तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी मान्सूनने 98 टक्के देश व्यापला. मंगळवारी मान्सूनने गुजरात राज्य पार करीत राजस्थानसह पंजाब व हरियाणाचा काही भाग व्यापला. आता फक्त दोन टक्के देश बाकी असून, राजस्थानसह हरियाणाचा काही
भाग बाकी आहे.

येत्या 48 तासांत तो 100 टक्के देश व्यापणार आहे. मान्सूनने अरबी समुद्रासह राजस्थानातील जोधपूरपर्यंत प्रवास प्रचंड वेगाने केला. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून देशाच्या सर्व भागांत वेगाने जात आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात त्याचा जोर वाढत आहे. अरबी समुद्रातून गुजरात किनारपट्टी व केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणला 28 जून ते 2 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ठाणे, नाशिक, पुणे, सातारचा घाट परिसर या भागात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 30 जूनपर्यंत संततधार पाऊस होईल. विदर्भाला 28 जून रोजीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात 200 मिमी पाऊस मान्सून विदर्भातून सक्रिय झाल्याने तेथे जास्त जोर असून 28 जून रोजीही तेथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी विदर्भात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली. साकोली 200, भंडारा 156, अर्जुनी मोरगाव 154, देवरी 149, लाखनी 141, कोरची 135, पवनी 109, आमगाव 106 मिमी पाऊस झाला.

आगामी पाच दिवस असा पडेल पाऊस
कोकण : 28 जून ते 2 जुलै : अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट). पुणे, सातारा, नाशिक घाट : 28 ते 30 जून (ऑरेंज अलर्ट). मध्य महाराष्ट्र : 27 ते 30 जून : (संततधार ). मराठवाडा : 27 ते 30 जून : (संततधार). विदर्भ : 28 जून : (ऑरेंज अलर्ट), पुढे 2 जुलैपर्यंत (मुसळधार).

24 तासांतला राज्यातील पाऊस…
कोकण विभाग : माथेरान, पेण 120, भिवंडी, वाडा 110, तलासरी 100, कर्जंत 95, सांताक्रूझ 91, पनवेल 76, मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 60, पेण 35, मावळ 32, तळेगाव 26, मराठवाडा : किनवट 25, निलंगा 17, जिंतूर 13, विदर्भ : साकोली 200, भंडारा 156, अर्जुनी मोरगाव 154, देवरी 149, लाखनी 141, कोरची 135, पवनी 109, आमगाव 106, गोंदिया 86, तिरोडा 74, तुमसर 65. घाटमाथा : खंद 121, दावडी 128, अम्बोणे 91, भिवपुरी 90, वाणगाव 89, ताम्हिणी 86, लोणावळा 80, डुंगुरवाडी 78, भिरा 61.

हे ही वाचा :

दहशतवादविरोधी पथकाकडून अंबाबाई मंदिर सुरक्षेचा आढावा

पुणे : रिंगरोडमधील बाधित गावांचे 20 जुलैपर्यंत फेरमूल्यांकन

Back to top button