पुणे-लोणावळा लोकल अचानक रद्द केल्याने प्रवासी हैराण | पुढारी

पुणे-लोणावळा लोकल अचानक रद्द केल्याने प्रवासी हैराण

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: लोणावळा रेल्वे स्थानकात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याच्या कारणाने लोणावळा-पुणे मार्गावर दुपारी धावणार्‍या 2 वाजून 25 मिनिटांची तसेच 3 वाजून सात मिनिटांची तर पुणे-लोणावळा मार्गावरील सकाळी 10.25 व 11.45 मिनिटांची लोकल 26 ते 29 जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी स्थानकांमधून लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशी संख्या अधिक आहे. त्यामुळे आकुर्डी रेल्वे स्थानकातील लोकल रद्दचे फलक लागल्याचे पाहून प्रवाशांची तारांबळ उडाली. पुण्याच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने रिक्षा करून निगडीपर्यंत हेलपाटे मारून पुण्यासाठी बसने प्रवास करावा लागला.

स्थानकात नाही उद्घोषक

आकुर्डी स्थानकात उद्घोषक नसल्याने ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद आहे. परिणामी येथील रेल्वे कर्मचार्‍यांना प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता नाकी नऊ आले होते. लोकल रद्दचे फलक लागल्यानंतरदेखील प्रवाशी सतत लोकलची विचारणा करण्यासाठी येत होते.

विद्यार्थी, कर्मचार्‍यांना नाहक त्रास

आकुर्डी येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच या भागात काम करणारे कर्मचारी लोकलने अप-डाऊन करतात. लोकल रद्द झाल्यामुळे पैसे खर्च करून बस आणि अ‍ॅटोचा पर्यायी मार्ग निवडावा लागला, त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागली.

लोकल रद्दचा आदेश मुख्य कार्यालयामधून आल्यानंतर एक दिवसअगोदर या संदर्भातील फलक सायंकाळी लावण्यात आले होते. मात्र, बरेच प्रवाशी याबाबत अनभिज्ञ असल्याने दुसर्‍या दिवशी लोकल रद्दचे फलक पाहिल्यानंतर अवाक झाले. उद्घोषक नसल्याने प्रवाशांकडून सारखी विचारणा केली जात होती.
– महेंद्र आयगोळे, रेल्वे मुख्य बुकिंग अधिकारी

हेही वाचा:

पुणे: लोणावळ्यात 24 तासांत 85 मिमी पावसाची नोंद

पुणे: अकरावीची गुणवत्ता यादी 3 जुलैला होणार जाहीर; या आहेत महत्वाच्या तारखा

पुणे : मोबाईलवरून भरा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज

 

 

Back to top button