स्मार्ट लॉक करेल तुमच्या प्रवासी बॅगची सुरक्षा | पुढारी

स्मार्ट लॉक करेल तुमच्या प्रवासी बॅगची सुरक्षा

प्रवासादरम्यान आपल्याला नेहमी एक चिंता असते ती म्हणजे, आपल्या बॅगची. कोणी बॅग घेणार तर नाही ना? या भीतीपोटी आपले लक्ष कायम बस – ट्रेनच्या बॅग रॅकवर असते. एकटे प्रवास करताना, तर बॅग सोडून बाजूला जाणे म्हणजे मोठा टास्कच असतो. मात्र, सध्याच्या या गॅजेट वर्ल्डमध्ये तुमच्या बॅगवर देखरेख ठेवणारे स्मार्ट लॉक तयार झाले आहेत. हे छोटेसे स्मार्ट कुलूप तुमच्या सॅक, ट्रॅव्हल बॅगला अथवा तुमच्या पर्सच्या चेनला लावले की बस… ‘जीपीएस’च्या सहाय्याने हे स्मार्ट लॉक तुमची बॅग नेमकी कुठे आहे, हे तंतोतंत सांगेल. इतकेच काय, तर स्मार्टफोनच्या सहाय्याने तुम्ही याला लॉक – अनलॉकही करू शकता. तसेच तुमची बॅग तुमच्यापासून दूर गेल्यास फोनमध्ये आणि लॉकमध्ये अलार्मही वाजू लागेल. असे अनेक भन्नाट फिचर्स या छोट्याशा स्मार्ट लॉकमध्ये देण्यात आले आहेत.
की लेस लॉक

हे स्मार्ट लॉक की लेस असल्याने याला उघडण्यासाठी अथवा बंद करण्यासाठी कोणत्याही चावीची गरज नाही. यामुळे दरवेळी चावी शोधण्याचा आणि चावी हरवण्याचा प्रश्नच नाही. तुमच्या स्मार्ट फोनमध्ये या लॉकचे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर एका टचवरती तुम्ही याला लॉक – अनलॉक करू शकता.

मॉर्स कोडनेही करू शकता अनलॉक

सैन्यामध्ये आधी आपत्कालीन संदेश पाठवण्यासाठी मॉर्स कोडचा वापर केला जात होता. मॉर्स कोडमध्ये डॉट व डॅश अशा चिन्हांच्या आधारे एका प्रणालीद्वारे संदेश दिला जातो. याच कोडचा या लॉकमध्येदेखील वापर करण्यात आला आहे. लॉकवर तुम्ही ठेवलेला सिक्रेट मॉर्स कोड टच करून टाकल्यानंतर लॉक ओपन होते.

‘जीपीएस’ ट्रॅक करेल तुमच्या बॅगला

या स्मार्ट लॉकमध्ये देण्यात आलेल्या ‘जीपीएस’ ट्रॅकिंगमुळे बॅग चोरी होण्याचा धोका कमी होतो. बॅग कुठेही असली, तरी त्याचे लोकेशन तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर दिसते. त्याला ट्रॅक करत तुम्ही तुमच्या बॅगपर्यंत सहज पोहचू शकता. तसेच यामध्ये लाऊड सेप्रेशन अलार्म फिचर देण्यात आले आहे. यामुळे जर का कोणी तुमची बॅग तुमच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केल्यास लॉकमध्ये तसेच फोनमध्ये अलार्म वाजण्यास सुरुवात होते. याचा वापर तुम्ही बॅग्ससह सायकला लॉक करण्यासाठीदेखील करू शकता. याशिवाय या लॉकमध्ये रिचार्जेबल बॅटरी असल्याने तुम्ही याला मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने चार्जदेखील करू शकता. असे स्मार्ट लॉक बाजारात दीड-दोन हजारांपासून उपलब्ध आहेत.

Back to top button