पुणे : सर्व्हे चुकला अन् ताण वाढला..! थकबाकी वसुली मोहीम | पुढारी

पुणे : सर्व्हे चुकला अन् ताण वाढला..! थकबाकी वसुली मोहीम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे मिळकतकराच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरू असतानाच चुकीच्या पद्धतीने झालेल्या ‘जीआयएस’ सर्व्हेमुळे मिळकतकर विभागाच्या कामाचा ताण वाढला आहे. दरम्यान, करआकारणी आणि थकबाकीवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, चालू आर्थिक वर्षात थकबाकी असलेल्या 531 मिळकतींना सील केले आहे. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. महापालिकेच्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतींसदर्भात ‘जीआयएस’ सर्वेक्षण करण्याचे काम करण्यासाठी दोन संस्थांची नियुक्ती केली गेली होती. या संस्थांकडून झालेल्या चुकांचा परिणाम सध्या होत आहे.

मिळकतीचा वापर जर मालक स्वत: करीत असेल, तर त्यास 2019 पूर्वी देण्यात येणारी मिळकतकरातील चाळीस टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. परंतु, या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात निवासी मिळकतींची चुकीच्या पद्धतीने नोंद केली गेल्याने त्यांना वाढीव बिले गेली आहेत. यामुळे मिळकतकर विभागाला आता चुकीची बिले दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. सदर सर्वेक्षण हे वादातच अडकले आहे. याबाबत पडताळणी करण्यासाठी मिळकत विभागाने 104 मिळकतींची तपासणी केली. यामध्ये 92 मिळकतींची नोंद चुकीची असल्याचे आढळून आले आहे.

पहिल्या अडीच महिन्यांत 531 मिळकतींना सील ठोकले आहे. त्यांच्याकडे एकूण 38 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुढील काळात ही कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचे विभागप्रमुख अजित देशमुख यांनी स्पष्ट केले. शहरातील निवासी मिळकत दाखवून व्यावसायिक वापर करणार्‍या मिळकतींचा शोध घेण्यासाठी पालिकेने आता नवी क्लृप्ती शोधली आहे. यासाठी महापालिका लवकरच हेल्पलाइन नंबर जाहीर करून त्याद्वारे नागरिकांना निवासी मिळकतीत व्यावसायिक वापर सुरू असल्यास कळविण्याचे आवाहन करणार आहे.

हेही वाचा

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट ! पॉलिग्राफ, व्हॉइस लेअरमधील फरक सांगा; एटीएसला न्यायालयाची सूचना

पुणे : पूरस्थिती रोखण्यासाठी पथके; प्रभारी मनपा आयुक्त करणार नाल्यांची पाहणी

Back to top button