डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट ! पॉलिग्राफ, व्हॉइस लेअरमधील फरक सांगा; एटीएसला न्यायालयाची सूचना | पुढारी

डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट ! पॉलिग्राफ, व्हॉइस लेअरमधील फरक सांगा; एटीएसला न्यायालयाची सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर अ‍ॅनालिसिस चाचणी म्हणजे नेमके काय? तसेच त्या दोघांतील फरक स्पष्ट करण्याची सूचना सोमवारी न्यायालयाने पुणे दहशतवादविरोधी पथकाला (ATS) केली. डॉ. प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर अ‍ॅनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. त्यावर 30 जूनला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी 25 जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती. दरम्यान, तपासात कुरुलकराकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर अँड अ‍ॅनालिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली. त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयाला सादर केला होता.

विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी कुरुलकरच्या चाचण्या करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकार्‍यांना व्हॉइस लेअर अ‍ॅनालिसिस चाचणी म्हणजे काय? ती कशासाठी केली जाते? यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का? अशी विचारणा एटीएसच्या अधिकार्‍यांकडे केली. मात्र, एटीएसच्या अधिकार्‍यांना पुरेशी माहिती देता आली नाही. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले.

कुरुलकरचा चाचण्यांना विरोध

प्रदीप कुरुलकर याने या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला असून, न्यायालयात त्यास विरोध दर्शविणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.

हेही वाचा

पंढरपूर : भक्तिसागर 65 एकरांत लाखांवर भाविक दाखल

नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

पुणे : पूरस्थिती रोखण्यासाठी पथके; प्रभारी मनपा आयुक्त करणार नाल्यांची पाहणी

Back to top button