पंढरपूर : भक्तिसागर 65 एकरांत लाखांवर भाविक दाखल | पुढारी

पंढरपूर : भक्तिसागर 65 एकरांत लाखांवर भाविक दाखल

पंढरपूर; सुरेश गायकवाड : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 29 जून रोजी साजरा होत आहे. दोन दिवसांवर सोहळा येऊन ठेपला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूरनजिक आले आहेत. त्यामुळे पंढरपुरातदेखील भाविकांची गर्दी वाढत आहे. येथील 65 एकर येथील प्लॉटचे बुकिंगदेखील पूर्ण झाले आहे. सर्वच्या सर्व 497 प्लॉटचे वाटप झाले असून भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारून वास्तव्य करू लागले आहेत. या राहुट्यांत हरिनामाचा गजर सुरू झाला असून, भाविक भक्तीत तल्लीन झाले आहेत.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात उभारण्यात येत असलेल्या राहुट्यांना नदीपलीकडील 65 एकर (भक्तिसागर) येथे दिंड्यांना मुक्कामासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील सर्वच्या सर्व 497 प्लॉटचे वाटप पूर्ण झाले आहे. येथे सव्वातीन लाख भाविकांचे वास्तव्य असणार आहे. सध्या तंबू, राहुट्या उभारून सुमारे 1 लाख भाविक येथे वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले असल्याने भक्ती सागर विठ्ठल भक्तीत दंग झाल्याचे चित्र दिसून येते.

पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने या परिसरात कायम स्वरुपाची स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. पाणी, वीज, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांची गैरसोय थांबली आहे. भजन, कीर्तनाची सेवा येथेच पार पाडली जात असल्याने भक्तीसागरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. येथे अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्याबरोबर खासगी दुकानदारांनी प्रासादिक साहित्यांची दुकाने, चहाटपरी, हॉटेल, खेळणी आदींची दुकाने उभारण्यात आल्याने येथे प्रति पंढरपूर तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

रविवारपासून 65 एकरांत दिंड्या वास्तव्यास येऊ लागल्या आहेत. प्रशासनाकडून येथे भाविकांना मोफत जागा, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, प्रथमोपचार सेवा, पोलिस संरक्षण आदी सुविधा पुरण्यात आल्या आहेत. भाविकांना 24 तास सेवा देण्यासाठी येथे आपत्कालीन मदत केंद्र कार्यरत ठेवण्यात आले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पाऊस झाल्यास राहुट्यांच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. परिणामी, वारकर्‍यांना त्रास होणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने उपायोजना करणे आवश्यक आहे.

65 एकरमध्ये प्रति पंढरीच

आषाढी यात्रेसाठी मजल दरमजल करीत आलेले भाविक 65 एकर येथे दाखल झाले आहेत. तंबू, राहुट्या उभारून येथे 1 लाखाहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे येथे यात्रेचे स्वरूप आले आहे. प्रासादिक साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे येथे प्रति पंढरपूर असल्याचा भास होत असल्याचे चित्र दिसून येते.

Back to top button