कोल्‍हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : निष्पाप अर्जुन, बिचार्‍या तेजस्विनीचा काय दोष? | पुढारी

कोल्‍हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : निष्पाप अर्जुन, बिचार्‍या तेजस्विनीचा काय दोष?

गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : अतिशय खडतर परिस्थितीतून एखादा उद्योग उभा करणे, तो नावारूपाला आणणे अन् त्यातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचा आधारवड बनणे ही फार सोपी गोष्ट नाही. गडहिंग्लजचे युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी हे करून दाखवले खरे; मात्र नियतीला त्यांची ही गरूडभरारी पाहावली नाही. आकाशातच त्याचे पंख छाटले अन् ते क्षणाधार्थ जमिनीवर कोसळले. कोसळताना स्वतःच्या कुटुंबासह शेकडो कुटुंबे त्यांनी निराधार केली. संतोष यांच्या काही चुका असतीलही; पण निष्पाप मुलगा अर्जुनचा दोष काय आणि बिचार्‍या पत्नी तेजस्विनीची काय चूक? असे प्रश्न या तिहेरी आत्महत्येच्या प्रकाराने अनेकांना पडले आहेत. असे प्रकार यापुढील काळात तरी थांबावेत, यासाठी गडहिंग्लजकरांनी दाखवलेली एकजूट महत्त्वाची ठरली आहे.

संतोष शिंदे यांनी अर्जुन समूहाच्या माध्यमातून तेल उद्योग, बेकरी व्यवसाय उभारला. तरुणांसाठी व्यायामशाळा, शेतकर्‍यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच अन्य सामाजिक कार्यातही पुढाकार घेत योगदान दिले. हे करत असताना त्यांच्या आयुष्यातही भयावह प्रसंग आला अन् त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला सहज वाटणारे प्रकरण त्यांना तब्बल महिनाभराच्या जेलवारीला पुरेसे ठरले. यातच त्यांचा संयम ढळला. आपण निर्माण केलेले साम—ाज्य पत्त्यासारखे कोसळताना पाहणे त्यांना कदाचित पटले नाही; पण ते खंबीर मनाचे होते. त्यामुळे जेलमधून बाहेर पडताच त्यांनी पुन्हा नव्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अनेकांना स्फूर्ती देणारे संतोष इतक्या सहजासहजी हरतील आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतील, असे कोणालाही वाटत नव्हते.

जेलमध्येही संतोष यांनी अनेक कैद्यांनाही व्यायामाचे धडे देत तेथेही बांधिलकी जोपासली. जेलबाहेर आल्यावर अनेकांनी त्यांना धीर देत पुन्हा उभारी घेण्याचा सल्लाही दिला. त्यांनीही मी करून दाखवेन, असे जिद्दीने सांगितले. मात्र, शुक्रवारची रात्र त्यांच्यासाठी फारच निर्दयी ठरली. ते इतकेकू्रर वागतील, असे कोणालाही वाटले नाही. जीवापाड प्रेम असणारा मुलगा अर्जुन व सर्व अडचणीत खंबीरपणे साथ देणारी पत्नी तेजस्विनी या दोघांचाही त्यांनी सुरीने अंत केला. स्वतःही त्याच सुरीने वार करत आपले जीवन संपवले. संतोषच्या आत्महत्येची बातमी समजताच अनेकांना प्रचंड धक्का बसला. त्याहून मोठा धक्का त्यांनी पत्नी व मुलाला संपवून आपले जीवन संपवले, याचाच होता.

हानी कधीच भरून न निघणारी

संतोष गेले. मात्र, त्यांनी उद्योगाच्या जीवावर उभारलेल्या शेकडो कुटुंबांवर मरणयातना भोगण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी हात पुढे केला होता. अशा लोकांचेही हात पोळले जाणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे संतोष अनेकांना पोरके व निराधार करून गेले. त्यांच्यावर ज्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली अशा प्रवृत्ती गडहिंग्लजमधून हद्दपार करणे गरजेचे असल्याने गडहिंग्लजकरांनी एकजूट दाखवित या सर्वाचा निषेध व्यक्त करत कारवाईसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले. आता यात कारवाईही होईल. मात्र, संतोषसह इतर अनेक कुटुंबांची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.

Back to top button