हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; दहशतीचे वातावरण | पुढारी

हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; दहशतीचे वातावरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा

गेले काही दिवसांपासून हडपसर, फुरसुंगी परिसरात दर्शन देणाऱ्या बिबट्या ने आज (मंगळवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. हडपसरमधील गोसावी वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे साडेपाच वाजता हा हल्ला झाला.

संभाजी बबन आटोळे (रा. गोसावी वस्ती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंजा मारल्याने त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

संभाजी आटोळे आणि अमोल लोंढे हे दोघे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने संभाजी आटोळे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात संभाजी आटोळे हे जखमी झाले. हा प्रकार समजताच परिसरातील लोकांनी तेथे एकच गर्दी केली आहे. हल्ला केल्यानंतर बिबट्या जवळच्या पडक्या घरात, झुडपात लपला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या घटनेची माहिती आमदार चेतन तुपे यांनी वन विभागाला कळविली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. वन विभागाची मदत रवाना होत आहे. या घटनेमुळे साडेसतरा नळी, गावदेवी, गोसावी वस्ती परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

दरम्यान, वन विभागाच्या वतीने सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.

हेही वाचलत का?

 

Back to top button