मराठी साहित्य संमेलन : 2 फेब्रुवारीपासून अमळनेर येथे भरणार सारस्वतांचा मेळा | पुढारी

मराठी साहित्य संमेलन : 2 फेब्रुवारीपासून अमळनेर येथे भरणार सारस्वतांचा मेळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलने, दिग्गजांच्या मुलाखती, साहित्यिकांचे शताब्दी स्मरण करणारा खास कार्यक्रम अन् खान्देशी साहित्य वैभव उलगडणार्‍या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना अमळनेर येथे होणार्‍या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनुभवता येणार आहे. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी संमेलन रंगणार असून, परिसंवादांपासून ते पुस्तकांवरील परिचर्चेपर्यंतच्या साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

अमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलन आयोजित केले आहे. संमेलनात साहित्यिक-सांस्कृतिक असे भरघोस कार्यक्रम आयोजित केले असून, संमेलनामध्ये यंदा बालमेळाव्यापासून ते निमंत्रितांच्या कवितांपर्यंतचे बहुविध कार्यक्रम संमलेनाच्या साहित्य पंढरीत रंगणार आहेत. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनपूर्व कार्यक्रमात 1 फेब्रुवारी रोजी बालमेळावा होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

निमंत्रितांचे कविसंमेलन, ’खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत, दोन परिसंवाद, कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा आणि खान्देश साहित्य वैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण सध्याच्या पिढीतील कवी सादर करणार असून, ते या कवितांविषयी भाष्य करतील. 4 फेब्रुवारी रोजी दोन परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी कट्टा आणि गजल कट्टा असे कार्यक्रम होणार असून, दुपारी चार वाजता संमेलनाचे समारोप सत्र होईल. संमेलनात एक लेखक व एका प्रकाशकाचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये
250 गाळे असून, पुस्तक प्रकाशनासाठी ग्रंथप्रकाशन कट्टा करण्यात येणार आहे. प्रकाशकांना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी गाळे उपलब्ध होतील, असेही तांबे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Cheteshwar Pujara : माझा मुलगा कमबॅक करू शकतो; चेतेश्वर पुजाराच्या वडिलांना विश्वास

राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्‍या हवामान विभागाचा अंदाज

Back to top button