अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर मला आनंदच : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर मला आनंदच : खासदार सुप्रिया सुळे

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भरणेवाडी येथे शनिवारी (दि. 24) एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी खासदार सुळे यांना काही प्रश्न विचारले. त्यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार पुढच्या वारीला मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे तुकोबारायांच्या पालखीमध्ये पांडुरंगाला घातल्यावरून सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता, ’आपल्या पक्षातील एखादा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे? आणि दादा मुख्यमंत्री झाले, तर मला आनंदच होईल,’ असे सांगितले. दरम्यान, या वेळी पत्रकारांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे काय? असे विचारले असता सुळे म्हणाल्या, माझ्या कानावर तरी अशी चर्चा नाही. एका वर्तमानपत्रात अशी बातमी आलीय.

जयंत पाटील यांच्यावर होत असलेल्या ’ईडी’ चौकशीबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ’ईडी’ चौकशी होत आहे, यात मला काही आश्चर्य वाटत नाही. राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, जयंत पाटील अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर महाराष्ट्रात आणि देशात अशा कारवाया होतात. आतापर्यंत ज्या कारवाया किंवा आरोप झाले ते 95 टक्के विरोधी पक्षांवरच झालेत. जो विरोधात बोलतो त्यावर केस होते, हे पाहायला मिळतेय.

दूध दराबाबत भूमिका विचारली असता सुळे म्हणाल्या की, आमची भूमिका स्पष्ट आहे. परदेशातून दूध आणण्याच्या सरकारच्या धोरणाला सर्वप्रथम शरद पवार यांनी विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला, त्यामुळे दूध दराबाबत राष्ट्रवादी पक्ष हा शेतकर्‍यांच्याच बाजूने आहे. शेतकर्‍याला हमीभाव हा मिळालाच पाहिजे. सध्या भाव कशाला आहे? महागाई तर गगनाला पोहचली आहे.
अमित शहा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, आम्ही दडपशाहीवाले नाही, तर लोकशाहीवाले आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टीका करू नये, असे काही नाही.

आम्ही दिलदार आहोत, त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टीका करावी. चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन बारामती दौर्‍यावर येणार असल्यावरून विचारले असता सुळे म्हणाल्या, ’अतिथी देवो भव. कुणी कुठंही जावं. लोकशाही आहे, त्यामुळे ते बारामतीत आले तर गैर काय? त्यांना कुठल्या विकासकामांची पाहणी करायची असेल, तर त्याचेही आम्ही नियोजन करू.’

हे ही वाचा : 

मान्सून अखेर बरसला ; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसाच्या सरी

सांगली : ‘ईडी’कडून दुसर्‍या दिवशीही छापेमारी

Back to top button