सांगली : ‘ईडी’कडून दुसर्‍या दिवशीही छापेमारी | पुढारी

सांगली : ‘ईडी’कडून दुसर्‍या दिवशीही छापेमारी

सांगली, पुढारी वृत्तसेवा : सांगली, इस्लामपूर शहरात शुक्रवारी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले. दुसर्‍या दिवशीही छापेमारी सुरूच होती. सांगलीतील चार व्यापार्‍यांच्या बंगल्यांमध्ये तपासणी करण्यात आली. व्यापार्‍यांकडून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच काही बँक खात्यांचीही चौकशी करण्यात आली असल्याचे समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईडी पथके शुक्रवारी पहाटे सांगलीत दाखल झाली. सहा पथकांमधून अधिकारी कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. दक्षिण शिवाजीनगरमधील दोन उद्योजकांच्या बंगल्यावर त्यांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी सात वाजता तपासणी सुरू झाली. शनिवारी दिवसभर तपासणी सुरू असल्याचे समजले. पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त कायम होता. घरांची झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. आर्थिक व व्यवसायातील अनियमिततेच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे समजते.

Back to top button