पिंपरीत आढळला दहीपळस वृक्ष; पानांवर उमटतात कधीही लुप्त न होणारी अक्षरे | पुढारी

पिंपरीत आढळला दहीपळस वृक्ष; पानांवर उमटतात कधीही लुप्त न होणारी अक्षरे

पिंपरी(पुणे) : मोशी येथे दहीपळस नावाचा एक संकटग्रस्त वृक्ष आढळला असून, त्याच्या पानांवर कोणत्याही टोकदार किंवा टणक वस्तूने लिहिले असता कधीही लुप्त न होणारी अक्षरे उमटतात. या वृक्षास दधीपर्ण, दहीमन, दहीपळस किंवा दहीपलाश असेदेखील म्हणतात. पिंपरी चिंचवडचे वनस्पती अभ्यासक प्रा. किशोर सस्ते यांना हा वृक्ष आढळला आहे.

या वृक्षाच्या पानावर सीता-रामाला संदेश लिहीत असे, म्हणून यास सीतापत्र असेदेखील म्हणतात. याचे वनशास्त्रीय नाव कॉर्डिया म्कलिओडी असून तो भोकरवर्गीय बोरॅजीनेसी या कुळातील आहे. हा वृक्ष आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघ म्हणजेच आययुसीएन रेड लिस्टच्या संकटग्रस्त यादीमध्ये समाविष्ट आहे. भारतात हा वृक्ष राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड येथे आढळतो. प्रा. सस्ते यांनी पुणे जिल्ह्यातील भामचंद्र, घोराडेश्वर आणि भंडारा डोंगररांगामधूनदेखील या वृक्षाची नोंद केलेली आहे.

वृक्षाचे संगोपन, संवर्धन गरजेचे

हा वृक्ष कावीळ आणि उच्च रक्तदाब यावरदेखील उपयुक्त आहे. मोशी येथील खाणकाम परिसरातील टेकड्यांवर हा वृक्ष आढळला आहे. या आधी याच परिसरातून दहिपळसाचे मोठे झाड नामशेष झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील हा एकमेव दुर्मिळ असा वृक्ष आहे. 2019 साली एका खासगी कंपनीने पिंपरी चिंचवड परिसरातील जैवविविधतता अंतर्गत विविध वृक्षांची नोंद केली आहे. परंतु, या यादीमध्ये येथील अनेक दुर्मिळ वनस्पतींची नोंदच केली गेलेली नाही. विकासकामे, खाणकाम आणि टेकड्यांची तोडफोड यामुळे हे वृक्ष दुर्मिळ होत आहेत. या वृक्षाचे भविष्यात संगोपन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.

गुप्त संदेश वाहक

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या पानांचा उल्लेख भूमिगत क्रांतिकारक गुप्त संदेश पाठवण्यासाठी करत असत. या झाडांच्या पानांमार्फत संदेशवहन केले जाते, असा सुगावा इंग्रजांना लागताच त्यांनी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले असे म्हटले जाते.

विविध आजारांवर उपयुक्त

हा वृक्ष कर्करोग, पॅरालिसीस (पक्षाघात) या आजारावर उपयुक्त आहे. या वृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये किंवा झाडाखाली दूध ठेवल्यास त्याचे दही होते. यांची पाने पळसासारखी आहे म्हणून यास दहीपळस म्हणतात. मद्यपानाची नशा उतरण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो.

हेही वाचा

विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर

वेल्हे : भातरोपांसह खरिपाच्या पेरण्या वाया

बारामतीत आजपर्यंत सरासरीच्या फक्त 13 टक्के पाऊस

 

Back to top button