वेल्हे : भातरोपांसह खरिपाच्या पेरण्या वाया | पुढारी

वेल्हे : भातरोपांसह खरिपाच्या पेरण्या वाया

दत्तात्रय नलावडे : 

वेल्हे : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात भातपिकांचे आगर असलेल्या वेल्हे तसेच हवेली तालुक्यात धूळवाफेवर पेरणी केलेल्या भातरोपांसह इतर खरीप पिकांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 2011 नंतर प्रथमच जून महिन्यात पावसाने डोंगरी पट्ट्यात पाठ फिरवली आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांसह सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम पट्ट्यात कडकडीत उन्हाळा सुरू आहे. 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होते. मात्र, जून महिना संपत आला तरी पावसाचा थेंबही पडत नाही. त्यामुळे बियाण्यांची उगवण झाली नाही. तालुक्यातील विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत.

नदीतीरावरील परिसरात पंपाने भातरोपांना पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. अशा शेतकर्‍यांची संख्या आठ-दहा टक्केही नाही. सर्वांत गंभीर स्थिती पश्चिम हवेलीतील सिंहगड पानशेतसह राजगड, तोरणा खोर्‍यात आहे. बहुतेक ठिकाणी भातबियाण्यांची उगवण झाली नाही. कडकडीत उन्हामुळे बियाणे कीटक, मुंग्यांनी खाऊन फस्त केले आहे. पेरणी केलेले लाखो रुपयांचे बियाणे वाया गेल्याने शेतकर्‍यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी पैसेही नाहीत, असे गंभीर चित्र पुढे आले आहे.

मान्सून सुरू होणार म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंहगड भागासह पश्चिम हवेली, वेल्हे तालुक्यातील तोरणा-राजगड भागात शेतकर्‍यांनी धूळवाफेवर भातरोपांच्या पेरण्या केल्या. वेल्हे तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी सर्वाधिक साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र भातपिकांच्या लागवडीखाली आहे. जून सुरू होण्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने काही भागांत जमिनीत ओल होती. यामुळे शेतकर्‍यांनी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भातरोपांच्या पेरण्या केल्या. मात्र, आता त्या वाया गेल्या आहेत.

सुरुवातीला थोडीफार ओल असल्याने धूळवाफेवर भातबियाण्यांची पेरणी केली. मात्र, दोन आठवडे झाले तरी पावसाचा थेंब पडला नाही. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांच्या भाताच्या पेरण्या वाया गेल्या आहेत.
                                         – देविदास बेलुसे, शेतकरी, मोगरवाडी, ता. हवेली

गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच पावसाने जून महिन्यात दडी मारली आहे. महागडे बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. निम्म्याहून अधिक पेरण्या वाया गेल्या आहेत. दोन ते तीन दिवसांत पाऊस न पडल्यास उर्वरित रोपेही वाया जाणार आहेत.
                                                                      – हनुमंत दिघे, शेतकरी, वेल्हे

कृषी विभाग हतबल
हवेली तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली 19 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी भाताचे 2500 हेक्टर क्षेत्र सिंहगड, पश्चिम हवेली भागात आहे. यातील सर्वाधिक क्षेत्र भातपिकांचे आहे. मान्सूनचा पाऊस पडल्यावर शेतकर्‍यांनी भात व इतर पिकांच्या पेरण्या सुरू कराव्यात, असे आवाहन कृषी विभाग वारंवार करीत असले, तरी पावसाळ्याच्या सुरुवातीचा महिनाच जवळपास कोरडा गेल्याने कृषी विभागही हतबल झाला आहे.

Back to top button