पिंपरी(पुणे) : पैसे न दिल्याच्या कारणावरून कामगाराचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी 24 एकास अटक केली आहे. प्रेमबहादूर करण थापा (40, रा. राजू दगडेचाळ, पाटीलनगर, बावधन, पुणे) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. निलकुमार राई (33, रा. वानवडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी रंजन सुधीर विशू (48, रा. रानवाराजवळ, फुटपाथवर बावधन, पुणे) आणि रतनसिंग मनोहरसिंग चौहान (64, रा. एआरडी कॉलनी, बावधन, पुणे) यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बावधन येथे थापा यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केला केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी दोन पथके तयार केली. दरम्यान, पोलिस अंमलदार ओम कांबळे यांना माहिती मिळाली की, मयत प्रेमबहादूर थापा आणि त्याचा साथीदार अनिलकुमार मागील तीन ते चार दिवसांपासून रामनगर, बावधन येथे फिरत होते. मात्र, अनिलकुमार बुधवार दुपारपासून अचानक गायब झाला आहे. दरम्यान, अनिलकुमार बावधन येथील एका कंपनीत काम करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली.
त्यानुसार, पोलिसांनी कंपनीत जाऊन माहिती घेतली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता तो पुण्यातील कोंढवा परिसरात असल्याचे समोर आले. अनिलकुमार वानवडी येथील त्याच्या नेपाळी मित्राकडे गेल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, पोलिसांनी वानवडी येथील नेपाळी वस्तीत जाऊन त्याचा शोध घेतला. आरोपी अनिलकुमार याला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अनिल कुमार आणि प्रेमबहादूर हे एकत्र भंगार गोळा करीत होते. भंगार विक्रीतून आलेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवत होते. दरम्यान, थापा यांनी भंगार विक्रीतून आलेल्या पैशातील हिस्सा न दिल्याने अनिलकुमार त्यांच्यावर चिडून होता. या रागातूनच अनिलकुमार याने थापा यांचा खून केला. याप्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा