पुणे : कैद्यांना स्मार्टकार्ड फोनद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद | पुढारी

पुणे : कैद्यांना स्मार्टकार्ड फोनद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कारागृहातील कैद्यांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी स्मार्टकार्ड फोनद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. योजनेची अमलबजावणी चांगल्यारीतीने झाल्यास संपूर्ण राज्यातील इतर कारागृहांत स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक सुनील धुमाळ तसेच इतर तुरुंग अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावाला शासनाने मान्यता दिल्यानंतर अ‍ॅलन ग्रुप, एल- 69 तमिळनाडू यांच्या वतीने शुक्रवारपासून (दि. 23 ) कारागृहातील कैद्यांना पात्रतेनुसार महिन्यातून 3 वेळा प्रत्येकी 10 मिनिटांसाठी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कॉईन बॉक्स सद्य:स्थितीत बाजारात उपलब्ध होत नाहीत. कॉईन बॉक्स नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती करून मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी सुविधा बंद झाल्यामुळे कैद्यांचा नातलगांसोबत संवादाला आडकाठी निर्माण झाली होती. त्याशिवाय अतिसुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील कैद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स असलेल्या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्या धर्तीवर हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

येरवडा कारागृहात सर्कलच्या ठिकाणी हे फोन ठेवण्यात आले असून, यामध्ये स्मार्टकार्ड वापरून घरच्यांना कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कैद्यांना या सुविधेचा सध्या महिन्यांतून तीन वेळा लाभ घेता येईल. त्यामध्ये त्यांना आपल्या घरच्यांशी प्रत्येकवेळी दहा मिनिटे बोलता येईल. मात्र, यासाठी कैद्यांना स्वखर्चातून ही स्मार्टकार्ड रिचार्ज करून कुटुंबीयांशी बोलता येईल. या उपक्रमासाठी 40 फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
        – अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, पुणे. 

हे ही वाचा :

पुणे : आरटीओत 30 हजार स्मार्ट कार्ड पेंडिंग

पुणे शहरात कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ

Back to top button