पुणे : पुढारी वृत्तसेवा: आरसी बुकची तब्बल 30 हजार स्मार्ट कार्ड पुणे आरटीओमध्ये पेंडिंग आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिकांना या स्मार्ट कार्डसाठी पुणे आरटीओमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, ती काही नागरिकांना मिळेनाशी झाली आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात 5 हजार लायसन्स आणि 25 हजार असे एकूण 30 हजार स्मार्ट कार्डचे प्रिंटिंगच झालेले नसल्याने ती नागरिकांना दिलेली नाहीत. परिवहन विभागाने वाहन परवाना आणि आरसी बुक संदर्भातील स्मार्ट कार्डसाठी पूर्वी रोझ मार्टा कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीचा करार नुकताच संपला आहे.
त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत. परंतु, आता परिवहन विभागाने कर्नाटक येथील एमसीटी कार्ड अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेट या नव्या कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीने सात कोटींची रक्कम या करारापोटी बँकेत भरली आहे. त्यामुळे 1 जुलै 2023 पासून या कंपनीचे कामकाज सुरू झाल्यावर आरसी व वाहन परवान्याची स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत.
नव्या स्मार्ट कार्डवर वाहनमालकाचा फोटो
पूर्वी वाहनचालकांना देण्यात येणार्या स्मार्ट कार्डवर एक चीफ असायची. आता नव्या कंपनीकडून देण्यात येणार्या स्मार्ट कार्डवर चीफ नसून वाहन चालक- मालकाचा फोटो असणार आहे. त्यामुळे वाहन परवान्याप्रमाणेच आरसी बुकवर देखील वाहनमालकाचा फोटो असेल.
छपाई तीन जिल्ह्यात, लेझर तंत्रज्ञानाचा वापर
नव्या आरसी बुक आणि वाहन परवान्याच्या स्मार्ट कार्डची छपाई मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांत होणार आहे. तेथून सर्व स्मार्ट कार्ड इतरत्र पोस्टाने पोहोचविली जाणार आहेत. त्यासोबतच या स्मार्ट कार्डावरील छपाई चांगल्या प्रकारे आणि उत्तम दर्जाची असावी, याकरिता लेझर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.