पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात यंदा उन्हाळ्यात बराच काळ पाऊस पडल्याने व वार्यांचा प्रभाव खालच्या थरात जास्त असल्याने हवेची गुणवत्ता समाधानकारक गटात आहे. मात्र शहरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. हा निष्कर्ष सफर या संस्थेने दिला आहे.
पाषाण येथील सफर ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणारी संस्था शहराच्या हवेचे प्रदूषण मोजत असते. उन्हाळ्यात प्रदूषण सर्वात जास्त जाणवते कारण हवेत आर्द्रता कमी असते, पाऊस नसतो. त्यामुळे मार्च ते मे हे तीन महिने व जूनचा अर्धा महिना असे साडेतीन महिने प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. यात प्रामुख्याने हवेतील प्रदूषित धुलिकणांसह कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायसल्फाईडचे प्रमाण वाढलेले असते. मात्र यंदा शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक गटात आहे. फक्त कार्बन डायऑक्साईडडचे प्रमाण 300 पीपीएमच्यावर आढळले.
स्वारगेट, शिवाजीनगरला प्रमाण मध्यम
शहरातील स्वारगेट व शिवाजीनगर ही ठिकाणे सर्वाधिक गर्दीची आहेत. तेथील हवेची गुणवत्ता कायम 200 मायक्रो मिलिग्रॅम पर क्युबिक मीटर इतकी जास्त असे. मात्र सध्या स्वारगेटच्या हवेची गुणवत्ता 170 तर शिवाजीनगरची 180 इतकी आहे. हे प्रमाण मध्यम गटात गणले गेले आहे. कात्रज, कर्वे रस्ता, म्हाडा कॉलनी यांसह शहरातील इतर भागांतील हवेची गुणवत्ता 30 ते 45 या गटात आहे. ती समाधानकारक गटात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही गुणवत्ता जाहीर केली आहे.
धूलिकणांचे प्रमाण घटले
वाहन प्रदूषणातून होणारे धूलिकण (2.5) व धूलिकण (10) या प्रकारच्या धूलिकणांचे शहरात सर्वाधिक प्रदूषण असते. पीएम 2.5 चे 90 ते 100 तर पीएम 10 चे प्रमाण 180 ते 220 च्या गटांत असते. मात्र सध्या हे प्रदूषण खूपच कमी, म्हणजे 30 ते 45 मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक
मीटर इतके कमी झाले आहे.
सफर व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार शहरात यंदा उन्हाळ्यात मार्च, एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस झाला. मेच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस होता. त्यामुळे आर्द्रता जास्त होती. त्या वेळी वातावरणाच्या खालच्या व वरच्या थरात प्रदुषणाची पातळी कमी दिसली. जूनमध्येही ही पातळी खूप चांगल्या स्थितीत आहे. शहरात अजूनही बहुतांश भागात कचरा जाळला जातो, तसेच इतर काही कारणांमळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्याचा स्पष्ट उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
हे ही वाचा :