वाढतोय व्यवसायाभिमुख पदवीकडे कल

वाढतोय व्यवसायाभिमुख पदवीकडे कल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी विद्यार्थी आता पारंपरिक शिक्षणाकडे कानाडोळा करीत थेट नोकरी देणार्‍या आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. त्यामुळे शहरासह उपनगरांमधील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या शोधात आहेत. पदवी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून, दुसरी फेरी सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पदवीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिली आहे.

बारावीनंतर विद्यार्थी प्रामुख्याने करिअरचा विचार करू लागतात. त्यामुळे मुले करिअरसाठी आवश्यक अभ्यासक्रमांचा विचार करू लागली आहेत. यातूनच कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक शाखांबरोबरच बीबीए, बीएस्सी अ‍ॅनिमेशन, बीसीए सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, वाइन टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांना तरुणाईचे प्राधान्य आहे. तर स्टोरी बोर्ड, जाहिरात, सिनेमा, गेम, कॅरेक्टर डिझायनिंग, मूव्हमेंट, मोल्डिंग, पार्श्वसंगीत आदी क्षेत्रांमधील करिअरसाठी बीएस्सी अ‍ॅनिमेशन कोर्सला प्राधान्य आहे. याशिवाय चित्रपट, जाहिरात, पत्रकारिता, जनसंपर्क, अशा क्षेत्रांत करिअर करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांचे मास कम्युनिकेशन कोर्सला प्राधान्य आहे.

पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये विज्ञान शाखेतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, डेंटल, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. बीए एलएलबी, बीबीए एलएलबी किंवा पाच वर्षांचा एमएस्सी इंटिग्रेटेड प्रोग्राम हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. तसेच वाणिज्य शाखेतील सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, बँकिंग फायनान्स, कन्सल्टंट, विमा, विपणन, डिजिटल मार्केटिंग, विविध कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील कामे मिळण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. विज्ञान शाखेच्या आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स, पायथॉन प्रोग्रामिंग, मॅथलॅब, पायथॉन प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रोबोटिक्स, उपकरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्र, वैद्यकीय जीवशास्त्र आदी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता केवळ पदवीपेक्षा अर्थार्जन करणारे शिक्षण हवे असल्याचे दिसून येत आहे.

यंदा बीसीए सायन्सला खूप मागणी आहे. याचे कारण बारावीपर्यंत गणित हा विषय नसलेला विद्यार्थी देखील कॉम्प्युटरमध्ये करिअर करू शकतो. त्याचबरोबर बीएस्सी कॉम्प्युटरला देखील चांगली मागणी आहे. बीबीएची मागणी करणारे विद्यार्थी देखील भरपूर आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी पदवीला प्रवेश घेण्याअगोदर संबंधित महाविद्यालयांमधील विभागप्रमुखांशी भेटून करिअरच्या संधीविषयी चर्चा केली, तर विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो.
                                      – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news