पुणे : पालेभाज्या कडाडल्या ; कोथिंबीर 50 रुपये; मेथी, कांदापात, शेपू 30 रुपये गड्डी | पुढारी

पुणे : पालेभाज्या कडाडल्या ; कोथिंबीर 50 रुपये; मेथी, कांदापात, शेपू 30 रुपये गड्डी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या कडाक्याने निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात मान्सून लांबणीवर पडल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. मंडईमध्ये पालेभाज्यांना मागणी अधिक असल्याने कोथिंबिरीचे दर 50 रुपयांवर पोहोचले असून मेथी, कांदापात व शेपूचे दर 40 रुपयांवर गेले आहेत. तर, अन्य पालेभाज्यांचे दर 25 रुपये गड्डीवर गेले आहेत. पालेभाज्यांचे विक्रेते चरण वणवे म्हणाले, अवकाळी पाऊस व उन्हाचा चटका बसल्याने पालेभाज्यांवर डाग पडले आहेत. त्यामुळे, पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे.

बहुतांश ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मान्सून वेळेत येईल या अपेक्षेने कोथिंबिरीचे बियाणे टाकलेल्या शेतकर्‍यांचे बियाणे मान्सून अभावी जळून गेले आहेत. परिणामी, बाजारात आवक घटली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे विभागासह नाशिक व लातूर भागांतून एक ते सव्वा लाख कोंथिबिरीच्या जुड्यांची आवक होत आहे. तर, मेथीच्या 50 हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात असून डाग पडलेल्या मालाची कमी भावाने विक्री करण्यात येत आहे. तर, दर्जेदार पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहे. मॉन्सून आल्यानंतरही पुढील महिनाभर पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेते सचिन कुलट यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

‘पुढारी सहकार महापरिषद’ आज पुण्यात

राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे अन् फडणवीस

 

Back to top button