‘म्हाडा’च्या पुनर्विकासात समान न्याय ; मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचे आश्वासन | पुढारी

‘म्हाडा’च्या पुनर्विकासात समान न्याय ; मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचे आश्वासन

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  ‘म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारा प्रस्ताव मान्य करू,’ असे आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी येरवडा नागपूर चाळ येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील नागरिकांना दिले. तसेच पुनर्विकास करताना येथील नागरिकांना पुढे कोणताही कायदेशीर त्रास होणार नाही याचीदेखील दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना तेथील नागरिकांची मते, येणार्‍या अडचणी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्याची मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली होती. यानुसार पाटील, वास्तूविशारद बनकर यांनी नुकतीच नागपूर चाळ येथील म्हाडाच्या इमारतींची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते.

एल. एच. आणि एम. टाइपच्या सदनिक व मोडकळीस आलेल्या सदनिकांची पाटील यांनी पाहणी केली. पुनर्विकास करताना अडचण येणार्‍या एअरफोर्सच्या 100 मीटर सीमाभिंतीसह काही इमारतींना असणार्‍या छोट्या रस्त्यांचीदेखील त्यांनी पाहणी केली. परिसरातील पायाभूत सुविधांवर येणारा ताण याबाबत त्यांनी माहिती घेतली. यावर सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. भाजपचे मंगेश गोळे, बाळासाहेब जानराव, गाळेधारक महासंघाचे शिवाजीराव ठोंबरे, नामदेवराव घाडगे, समतानगर संयुक्त संघाचे डी. के. जाधव, मेजर रणपिसे, मरसाळे,चव्हाण, गजानन जागडे, घनश्याम पंचमुख, अनिल राऊत, मोहन बारे, का.बा गायकवाड आदींसह या वेळी नागरिक उपस्थित होते.

म्हाडाच्या वतीने पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला घेण्यात येणार आहे. तसेच महापालिकेकडील प्रत्यक्ष
जागेची पाहणी करून पुनर्विकासाची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
                                      – अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा.

हे ही वाचा  :

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘जीवन गौरव’ जाहीर

जालना : शेगाव दर्शनाहून परतताना कारचा अपघात; महिलेचा होरपळून मृत्‍यू

दिवसातून ८ वेळा चहा प्या अन् शतायुषी व्हा!

Back to top button