

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जून महिना सरत आला तरी पावसाचा पत्ता नाही. 35 अंश तापमानामुळे पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या पूर्ण महिनाभर पाऊस पडणार नसल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आणखी आठ दिवस नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या वर्षी 15 जूननंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शहरवासीय सुखावले होते. मात्र, यंदा जून महिना संपत आला आहे. तापमानदेखील कमी झाले आहे. तरी शहरवासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत. जून महिन्यातदेखील वेगाने फिरणार्या वातानुकुलित यंत्रणेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरवर्षी जून महिन्यात शहरास पाणीपुरवठा करणार्या धरणातील साठादेखील कमी होतो. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार शहरवासीयांच्या डोक्यावर आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत.
जानेवारी महिन्यानंतर थंडी ओसरली आणि उकाडा जाणवायला लागला. तेव्हापासून ते आजतागायत उकाड्यात वाढ होत आहे. यंदा 42 अंश उच्चतम तापमानाची नोंद झाली आहे. जून महिना संपत आला तरी सकाळपासून असणार्या उकाड्यामुळे हैराण नागरिकांना पंखे आणि एसी लावल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे उकाड्याचे चार महिने थंडावा देऊनही पंखे आणि एसी यांना सुटी नाहीच.
जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर नागरिकांना मुख्यत: वाफाळलेल्या चहाची तलफ होत असते. मात्र, यंदा पावसाऐवजी उकाडाच आहे. काहीशा वार्यामुळे समाधान मिळत असले तरी नागरिक थंडाव्यासाठी अजूनही शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे अद्यापही शहरात शीतपेयांची दुकाने थाटलेली आहेत.
पाऊस लांबल्याने त्याचा बाजारपेठेवरही परिणाम होत आहे. भाज्या, फळे व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. बाजारपेठेत असलेल्या पावसाळी वस्तूंनादेखील मागणी नसल्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत. शेतकर्यांच्या पेरणीची कामेदेखील खोळंबली आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीला बाजारपेठेत रेनकोट, छत्र्या दिसू लागतात. शक्यतो शाळा सुरू होण्याच्या एक आठवडाभर आधीपासूनच रेनकोट व छत्र्या खरेदीला प्रचंड प्रतिसाद असतो. सध्या शाळाही सुरू झाल्या आहेत. पण पाऊस नसल्यामुळे दुकानाबाहेर लटकविलेल्या रेनकोटला ग्राहकांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विक्रेत्यांनादेखील पाऊस कधी पडेल, याची आस लागली आहे.
सध्या हवा कोरडी आहे. हवेमध्ये आर्द्रता नाही. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. तसेच, अशा वातावरणात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. बाहेरच्या पदार्थामधील पाणीदेखील दूषित असते. शीतपेयांमध्ये जे पाणी व बर्फ वापरला जातो, त्यामुळे पोटाचे विकार होतात. फळे खाणार्यांनीदेखील फळे स्वच्छ धुवून खावीत.
– डॉ. किशोर खिलारे, अध्यक्ष, जनआरोग्य मंच, पुणे
हेही वाचा