अभियांत्रिकी, कृषी प्रवेशाची नोंदणी उद्यापासून ; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली | पुढारी

अभियांत्रिकी, कृषी प्रवेशाची नोंदणी उद्यापासून ; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाची नोंदणी अखेर 24 जूनपासून सुरू होणार आहे. सीईटी सेलकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रथम नोंदणी होणार असून, त्यानंतर अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सुरुवात पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच तंत्रशिक्षण संचलनालयाकडून महाविद्यालयांच्या जागा अपडेट करण्याचे काम सुरू आहे.

यामुळे जागा अंतिम होत नाहीत तोपर्यंत कॅप प्रक्रिया सुरू होऊ शकत नसल्याची स्थिती होती. तर दुसरीकडे सीईटीचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस झाले तरी अभियांत्रिकी प्रवेश सुरू झालेले नसल्याने राज्यातील हजारो विद्यार्थी हवालदिल झाले होते. सीईटी सेलने प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्याची घाई का केली, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत होता. अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने नोंदणीची तारीख जाहीर केली आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग 1 नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रवेशप्रक्रिया उशिरा होऊनही प्रवेशात वाढ झाली होती. अभियांत्रिकीच्या 1 लाख 45 हजार 201 जागा होत्या त्यापैकी 1 लाख 09 हजार 499 जागांवर प्रवेश झाले होते. तर 36 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. गतवर्षी राज्यात असलेल्या 1 लाख 45 हजार 201 जागांपैकी 1 लाख 09 हजार 499 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले, तरच आयटी क्षेत्रात नोकरी हमखास असे चित्र गेल्या वर्षीच्या प्रवेशात दिसून आले होते.

नेहमीच्या मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची पसंती कमी दिसली. तर कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंगसाठी कल दिसून आला. सायबर सिक्युरिटी, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (अर्टिफिशल इंटेलिजन्स), डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग (एमएल), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सारख्या अभ्यासक्रमांनाही पसंती दिली होती. कृषी शिक्षणामध्ये बी. एस्सी. (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी. (फॉरेस्ट्री), बी.एस्सी अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट, बी. टेक. (अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीयरिंग) या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन या शाखांच्या जागांमध्ये गतवर्षी वाढ करण्यात आली. कृषी क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलांमुळे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

गतवर्षीच्या जागा अशा
अभियांत्रिकी पदवी : 1,43,413
कृषी अभ्यासक्रम : 8,551
बी. एचएमसीटी : 892

 हे ही वाचा :

शेवगावात सशस्त्र दरोडा : दरोडेखोरांच्या हल्यात दोघांचा मृत्यू

मान्सून रत्नागिरीतच, पुढे जाता जाईना ! तळकोकणात 11 दिवस अडखळला

Back to top button