मान्सून रत्नागिरीतच, पुढे जाता जाईना ! तळकोकणात 11 दिवस अडखळला | पुढारी

मान्सून रत्नागिरीतच, पुढे जाता जाईना ! तळकोकणात 11 दिवस अडखळला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अकरा जूनपासून मान्सून रत्नागिरीतच अडखळला असून पुढे जाता जाईना. त्याने सर्वांचे अंदाज फोल ठरवत मोठी ओढ दिली आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला दक्षिण भारत व बिहारमध्ये तो प्रगती करीत आहे. दरम्यान, 23 ते 25 जूनदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचे आगमन राज्यात 11 जून रोजी तळकोकणात झाले.

तेव्हापासून तो रत्नागिरीतच अडखळला असून आजवरचा हा त्याचा विक्रमी मुक्काम ठरला आहे. तो राज्यात कितीही उशिरा दाखल झाला तरी पाच ते सात दिवसांत महाराष्ट्र काबीज करतो. मात्र, यंदा तो प्रथमच इतका अडखळला आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 22 जून रोजीही मान्सूनची प्रगती दिसली नाही. त्याउलट तो दक्षिण भारतात पुढे जात आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांत त्याची दुसरी शाखा वेगाने सक्रिय झाली असून पूर्व उत्तर प्रदेशात तो आगामी 2 दिवसांत प्रगती करेल.

मुंबई, पुण्याच्या उंबरठ्यावर आला पण…

कश्यपि यांनी सांगितले की, मान्सून मुंबई, पुणे शहरांच्या उंबरठ्यावर आला आहे. मात्र, अनुकूल वातावरणाअभावी पुढे जाण्यात अडचणी येत आहेत. या दोन्ही शहरांतील सापेक्ष आर्द्रता वाढली असून, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडेल.

कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मुसळधार
मान्सून पुढे जात नसला, तरी तो उत्तर भारतात प्रगती करीत असल्याने बिहारमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच मान्सून दक्षिण भारतात सक्रिय झाल्याने केरळ ते तामिळनाडू भागात तो बरसतो आहे. याचा परिणाम म्हणून 23 ते 25 जून या कालावधीत राज्यात मान्सून सक्रिय होईल. मात्र, जोर कोकण व मध्य महाराष्ट्रात जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी पुन्हा एकदा दिला आहे. मराठवाडा व विदर्भातही तो बरसण्याची शक्यता आहे.

विदर्भातून सक्रिय होण्याचा अंदाज
काही हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सून यंदा कोकणाऐवजी विदर्भातून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा तो रत्नागिरीऐवजी नागपूरमधून राज्यात सक्रिय होईल, असा दावा त्यांनी केला. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कोल्हापुरात उद्या काही भागांत गडगडाटासह पाऊस
अ‍ॅक्युवेदर संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरात उद्या (शनिवार) दिवसभर ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर रविवारी सकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सून विदर्भातून येऊ शकत नाही. तो कोकणातूनच पुढे जाईल. कारण त्याचा इतक्या वर्षांचा प्रवासाचा मार्ग ठरला आहे. उशीर झाला तरीही मान्सून दरवर्षीच्या मार्गानेच म्हणजे केरळ, तळकोकणमार्गे राज्य लवकरच व्यापेल.

हे ही वाचा : 

पुणेकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यांच्या रस्त्यातच जाणार

मुंबई : चार साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी वाढला

Back to top button