पुणेकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यांच्या रस्त्यातच जाणार | पुढारी

पुणेकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यांच्या रस्त्यातच जाणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  निम्मा जून महिना गेला, पावसाळा आला तरीही शहरातील रस्ते डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठीची कामे 40 टक्केच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्यात खड्डे असलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे. शहरात दरवर्षी विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदाई केली जाते. मागील काही वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी, मलःवाहिनी, पावसाळी वाहिनी टाकण्याची कामेही केली जात आहेत.

खोदाईची कामे झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनी आणि ठेकेदारांची असते. याशिवाय महापालिकेच्या पथ विभागाकडूनही रस्त्यावर डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याची कामे केली जातात. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अपेक्षित असते.  महापालिकेने यंदा शहरातील रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयांची सहा पॅकेजमध्ये निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. काही पॅकेजमधील कामेही सुरू केली. मात्र, पावसाळा सुरू झाला तरी केवळ 41 टक्केच रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत.

यातील पॅकेज एक हे आठ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे होते. त्यातील एक प्रभात रस्ता हा नागरिकांच्या विरोधामुळे डांबरीकरण करण्यात आला आहे. तर या पॅकेजमधील बिबवेवाडी मुख्य रस्ता, महादजी शिंदे रस्ता औंध, विश्रांतवाडी चौक येथे काम सुरू आहे. आतापर्यंत फक्त 0.10 टक्केच काम झाले आहे. पॅकेज दोन आणि तीन मध्ये 48.25 किलोमीटरचे रस्ते केले जाणार होते. त्यासाठी दोन्ही पॅकेजचे काम सुमारे 60 कोटी रुपयांचे आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या दोन पॅकेजमध्ये 40.31 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही सुमारे 16 किलोमीटरच्या रस्त्याची कामे शिल्लक आहेत.

शहरातील रस्त्यांच्या कामाचा पॅकेजनिहाय आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये 40 किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे वेगात करावीत, असे आदेश दिले आहेत.
                                           – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

हे ही वाचा : 

पंढरपूर : अपघातमुक्त आषाढी वारीसाठी पोलिसांचे प्राधान्य

सांगली : खुल्या जागांच्या बाजाराला आयुक्तांचा चाप

Back to top button