आकुर्डी : सांगा बरं..! आम्ही ज्येष्ठांनी चालायचं कुठून? | पुढारी

आकुर्डी : सांगा बरं..! आम्ही ज्येष्ठांनी चालायचं कुठून?

आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानात व्यायामाला येणार्‍या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. उद्यानातील जुने पेव्हिंग ब्लॉक काढून पुन्हा तेच बसविण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. या संथगती कामामुळे आम्ही चालायचे कुठून, असा प्रश्न याठिकाणी येणारे नागरिक विचारत आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठांना येथील उखडलेल्या ट्रॅकवरून चालताना दुखापतीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ट्रॅक दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी या ठिकाणी येणार्‍या नागरिकांतून होत आहे.

बारा एकर जागेत संत ज्ञानेश्वर उद्यान महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या उद्यानातील जॉगिंग ट्रॅक डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र गेल्या दीड महिन्यापासून हे काम सुरू आहे. त्यामुळे येथे येणार्‍या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, येथील समस्या सोडविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

महिलांच्या शौचालयात बिल्डिंग मटेरियलचे साहित्य

या उद्यानात व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी येणार्‍या महिलांच्या सुविधेसाठी शौचायलय आहे; मात्र या शौचालयात ठेकेदाराने बिल्डिंग मटेरियलचे साहित्य ठेवल्याने त्या ठिकाणी जाणे महिलांना त्रासाचे ठरत आहे. सिमेंटची पोती या ठिकाणी ठेवल्यामुळे पुरुषांची ये-जा सुरू असते.

उघडे विद्युत डीपी

उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅकवर विद्युत प्रकाशाची सुविधा असल्याने अनेक ठिकाणी डीपी बसविण्यात आले आहेत; मात्र काही डीपींना झाकण नसल्यामुळे शॉक लागून लहान मुलांना इजा होऊ शकते. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. व्यायामाला येणार्‍यांमध्ये युवावर्ग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. येथे जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, योगा तसेच मेडिटेशन, आदी सुविधा असल्याने नागरिक या उद्यानात प्राधान्याने येतात, परंतु येथील असुविधेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुरुष स्वच्छतागृहांची दुरवस्था

या उद्यानातील पुरुष स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहातील दरवाजांना कडी-कोयंडा नाही. यातील बेसिनचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. येथील जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने गवत वाढलेले आहे. तेथील देखभाल करणार्‍यास विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संत ज्ञानेश्वर उद्यानाला लागून बुद्धविहाराची सीमाभिंत आहे, तेथेच उद्यानातील पालापाचोळा टाकण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील पालापाचोळा काढण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने पुन्हा कचरा येथे टाकलेला दिसून येत आहे.

एक महिन्यापासून उद्यानाचे काम रखडले आहे, यामुळे नागरिकांना असुविधा होत आहे.

आबा तावरे, उद्यान देखभाल ठेकेदार.

काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार कानावर आली आहे. उद्यानाचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम लगेचच सुरू करण्यात येणार आहे.

संदीप ठोकळ, उद्यान अभियंता

पेव्हिंग ब्लॉक काही ठिकाणी वर-खाली झाले असल्याने तसेच काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक रस्त्यावर काढून ठेवल्याने चालण्यास जागाच नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होतो.

सूर्यकान्त बोलद्रा, ज्येष्ठ नागरिक

हेही वाचा

माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांचे नाव मुरबाड रेल्वेस्थानकाला द्यावे : कपिल पाटील

यूपीएससीच्या नोट्स चोरीला गेल्या तरी खचली नाही, जिद्दीच्या जोरावर.. दर्शनाच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल

 

Back to top button