यूपीएससीच्या नोट्स चोरीला गेल्या तरी खचली नाही, जिद्दीच्या जोरावर.. दर्शनाच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल | पुढारी

यूपीएससीच्या नोट्स चोरीला गेल्या तरी खचली नाही, जिद्दीच्या जोरावर.. दर्शनाच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल

पुणे पुढारी ऑनलाईन डेस्क : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा ट्रेकिंगला गेल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी कुजलेला अवस्थेत मृतदेह सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर तिची हत्या झाल्याचं पोस्टमार्टमधून समोर आलं. या सर्व घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. एका हुशार आणि कर्तबगार मुलीचा शेवट असा झाल्याने तिच्या वडिलांसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याने जर हत्या केली असेल तर त्याला लवकरात लवकर शोधा, अशा पोस्ट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

अशीच एक सध्या सोशल मीडियावर दर्शन पवार हिच्या मृत्यू संदर्भातील एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट उद्देश कृष्णा पवार याने शेअर केली असून या पोस्टमध्ये दर्शना पवारचा आतापर्यंतचा संघर्ष, शैक्षणिक कामगिरी आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांची झालेली अवस्था यावर भाष्य करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?

#uddeshblogs

दर्शना……🌿

इथे समोर ससून हॉस्पिटलच शवागृह आहे. दर्शनाचा शव शवविच्छेदनासाठी इथे आणलाय आता. जेव्हापासून ही बातमी कानावर आलीय मी एकदम सुन्न आहे. तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा. एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं? वडील साधे ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने. दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला 95%, बारावीला 98%, गणित विषयाची पदवीधर, कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती,आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती. पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेले. खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हतं तितक्यात MPSC च्या RFO परीक्षेचा आपण फॉर्म भरलाय हे तिच्या लक्षात आलं. त्वरित अभ्यास सुरु केला पूर्व परीक्षा पास झाली मुख्य ही पास झाली आणि विशेष म्हणजे हा सगळा अभ्यास तिने गावी केला होता. मुलाखतीच्या तयारीसाठी ती काही वेळ पुण्यात होती मुलाखतीचा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडून लागलेल्या निकालात तीची RFO पदावर निवड झाली होती.यात तिचा संघर्ष सांगताना कित्यकांचे डोळे पाणावले.गावात मिरवणूक निघाली कित्येक ठिकाणी सत्कार झाले आणि या सगळ्यात दर्शना व तिच्या घरातले खुश होते. पण अचानक हे घडलय. घरातले अजून धक्क्यात आहेत ही सापडलेली मुलगी आपली नाहीय हे त्यांना सतत वाटतंय पण दुर्दैवाने ती दर्शनाच आहे. हे नेमकं काय झालय हे पोलीस तपासात उघड होईलच पण दीदींनो जपा स्वतःला, नका ठेऊ एखाद्यावर सहज विश्वास.थोडा वेळ जाऊद्या.. घरातल्यांसोबत सतत संवाद ठेवा जे जे काही वाटतय ते शेयर करत जा. आणि दादांनो दीदींनो दोघांनाही सांगतो राग आलाय तर ओरडा, चीडा हव असल्यास मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोला. माणूस दुखावेल आणि काही दिवसांनी शांत होईल पण दोघांचं आयुष्य सुखरुप राहिल. ससूनमधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….ईश्वरा आपण माणूस आहोत याचा विसर पडू देऊ नकोस रे कोणाला…..

©️उद्देश

हेही वाचा

पुणे : वर्चस्ववादापोटी आदिवासींची पिळवणूक ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

पुणे : दिवेकर कुटुंबीयांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

Back to top button